सामना अग्रलेख – रशियातील खुनी होळी!

रशियाच्या क्रोकस सिटी हॉलवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला हे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे मोठेच अपयश म्हणावे लागेल. सरकारी यंत्रणांचा वापर करून पुनः पुन्हा निवडणुका जिंकणे आणि विरोधकांना तुरुंगात डांबून वा संपवून सत्तेवरील पकड मजबूत करणे हे काही फुशारकीचे लक्षण असू शकत नाही. सत्तेवरील पकड आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरील पकड या दोन भिन्न गोष्टी आहेत. पुतीन यांची नेमकी हीच गफलत झाली. खुनी होळी खेळून इसिसच्या दहशतवाद्यांनी सर्वशक्तिमान रशियाला डिवचले आहे.

रशियाचे सर्वेसर्वा व्लादीमीर पुतीन यांनी पाचव्यांदा रशियाची सत्ता काबीज करून जेमतेम आठवडाही उलटत नाही, तोच ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी भीषण दहशतवादी हल्ला घडवून पुतीन यांचे रक्तरंजित स्वागत केले. इस्मालिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खुरासान गटाने शनिवारी सायंकाळी रशियाची राजधानी मॉस्को येथे एका संगीत समारंभावर भयंकर अतिरेकी हल्ला चढवला. या हल्ल्यात 145 लोक मृत्युमुखी पडले, तर 150 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉल या प्रसिद्ध सभागृहात संगीत समारोह सुरू होता. कार्यक्रम ऐन रंगात आलेला असतानाच एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून पाच दहशतवादी हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ आले. पाचही दहशतवाद्यांनी रशियन सैनिकांचा गणवेश परिधान केलेला होता. हॉलमध्ये प्रवेश करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. समोर जो कोणी दिसेल त्यावर गोळय़ा झाडत दहशतवाद्यांनी हॉलमध्ये जमलेल्या संगीतरसिकांच्या मृत्यूचे भीषण तांडव घडवले. लपलेल्या लोकांना शोधून अतिरेकी ठार करत होते. मात्र तरीही काही लोक हॉलमध्ये लपून बसल्याचा संशय आल्यानंतर अतिरेक्यांनी बॉम्ब फेकून स्फोट घडवले, त्यामुळे संपूर्ण हॉललाच आग लागली. ‘पिकनिक’ नावाच्या

म्युझिक बँडचे सादरीकरण

सुरू असताना हा हल्ला झाला, त्यावेळी या हॉलमध्ये तब्बल 6 हजार 200 लोक उपस्थित होते. संगीत समारंभात रक्ताचा सडा पाडणारा हा क्रूर हल्ला घडवून अतिरेकी त्याच पांढऱ्या रंगाच्या कारमधून शांतपणे पळून गेले. या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियन जनतेला उद्देशून भाषण केले. या हल्ल्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन पुतीन यांनी रशियन जनतेला दिले. तथापि, जागतिक महाशक्ती असे बिरुद मिरवणाऱ्या रशियाचे सर्वसत्ताधीश पुतीन यांच्यासाठी हा हल्ला मोठाच लांच्छनास्पद म्हणावा लागेल. दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या 4 अतिरेक्यांसह 11 जणांना आता अटक करण्यात आली आहे व हे हल्लेखोर युक्रेनच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते, असे पुतीन यांनी म्हटले आहे. याउलट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘इसिस’ने आमचे सर्व मारेकरी सुरक्षित परतल्याचा दावा केला आहे. पुतीन सरकार चेचन्या आणि सीरियामध्ये हल्ले करून मुस्लिमांचा छळ करीत आहे, असा इसिसचा आरोप आहे. त्याचा सूड घेण्यासाठीच इसिसने हा हल्ला घडवला. मात्र या हल्ल्यास दहशतवादी कृत्य न समजता हे युद्ध आहे व यामागे युक्रेनचा हात आहे, असा संशय रशियाने व्यक्त केला आहे.

युक्रेनसोबत

गेली दोन वर्षे रशियाचे युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनवर खापर फोडून पुतीन महाशय मोकळे झाले आहेत. युक्रेन व अमेरिकेने मात्र रशियाचा हा दावा फेटाळून लावला आहे. या हल्ल्यामागे युक्रेन नसून हा दहशतवादी हल्लाच आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. वास्तविक रशियाचा हाडवैरी असलेल्या अमेरिकेने महिनाभरापूर्वीच मॉस्कोमध्ये गर्दीच्या समारंभात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची गुप्तचरांकडून आलेली माहिती रशियाला कळवली होती. मात्र रशियाने याची कोणतीही दखल घेतली नाही. ज्या हॉलवर हल्ला झाला, तेथील सुरक्षा रक्षकांकडे कुठलीही शस्त्र नव्हती. हॉलच्या प्रवेशद्वारावर कुठलाही प्रतिकार न झाल्यामुळे दहशतवाद्यांचे फावले व त्यांनी मोठी प्राणहानी घडवली. त्यामुळे रशियाच्या क्रोकस सिटी हॉलवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला हे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे मोठेच अपयश म्हणावे लागेल. सरकारी यंत्रणांचा वापर करून पुनः पुन्हा निवडणुका जिंकणे आणि विरोधकांना तुरुंगात डांबून वा संपवून सत्तेवरील पकड मजबूत करणे हे काही फुशारकीचे लक्षण असू शकत नाही. सत्तेवरील पकड आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरील पकड या दोन भिन्न गोष्टी आहेत. पुतीन यांची नेमकी हीच गफलत झाली. खुनी होळी खेळून इसिसच्या दहशतवाद्यांनी सर्वशक्तिमान रशियाला डिवचले आहे. निवडणुकीत अफाट यश मिळवूनही तोंडावर पडलेले पुतीन आता काय करणार, हे पाहावे लागेल!