सांगलीतील कॅफेंवर आजपासून कारवाई, प्रभागनिहाय चार पथके तैनात

कॅफेतील गैरप्रकारानंतर आता महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आली आहे. प्रभागनिहाय चार पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात महिला अधिकारी, कर्मचाऱयांचा समावेश आहे. शहरातील कॅफेंची यादी तयार करण्यात आली असून, उद्यापासून (दि. 24) धाडी टाकल्या जाणार आहेत. यामध्ये परवान्यासह कंपार्टमेंटची तपासणी करण्यात येणार आहे. आज सलग पाचव्या दिवशी शहरातील कॅफेंना टाळे लागलेले दिसत आहे.

शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तीन कॅफेंची तोडफोड केली. दोन दिवसांपूर्वी गुह्यात सहकार्य केल्याप्रकरणी कॅफेचालकास सहआरोपी करण्यात आले आहे. आता पोलीस दलाने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरात कॅफेंची तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी दिलेल्या निवेदनाची आयुक्त शुभम गुप्ता यांनी गंभीर दखल घेत आरोग्य आणि नगररचना विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार प्रभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. शुक्रवार (दि. 24) पासून कॅफेंची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने कंपार्टमेंटची तपासणी केली जाणार आहे. नियमबाह्य असणाऱयांवर कारवाई केली जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.