मराठी माणसाचा स्वाभिमान पायदळी तुडवलात, तुम्ही बकवास आहात; संजय राऊत यांचे टीकास्त्र

जनतेच्या न्यायालयात मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालाचे पोस्टमॉर्टेम झाले. शिवसेनेच्या महापत्रकार परिषदेत कायदेतज्ज्ञांनी या निकालाची अक्षरशः चिरफाड केली आणि ठिकऱ्या उडवल्या. नार्वेकर यांचा निकाल कसा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणारा आहे, याची सबळ पुराव्यांसह मांडणीच यावेळी करण्यात आली. हे सगळे पुरावे देऊनही ते मान्य करण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तयार नाहीत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासासेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. जनतेच्या न्यायालयासमोर येऊन राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेले आव्हान स्वीकारायला हवे असे राऊत यांनी म्हटले.

साध्या वकिलालाही जे कळतं ते तुम्हाला कळाले पाहिजे. जे पुरावे दाखवले ते बिनकाचेचे गॉगल लावून पाहात होता का ? असा सवाल विचारतानाच राऊत यांनी म्हटले की, शिवसेना ही महाराष्ट्राचा अस्मितेचे, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. तुम्ही तो स्वाभिमानच पायदळी तुडवला. तुम्ही कसले मराठी माणूस, तुम्ही बकवास आहात. संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीका करताना म्हटले की, नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षाच्या भूमिकेत अद्याप शिरलेले नाही. ते पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत अद्याप आहेत.

मिंधे गट, भाजप यांच्यातील जागावाटपासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, मुळात त्यांची शिवसेना नाही. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. शिवसेना इथे आहे, आम्ही 23 जागा लढतोय. आधीही लढत होतो आताही लढतो आहे. मिंधे गटाच्या मुंबईतील जागा कोणी लढायच्या हे गुजरातचे उद्योगपती ठरवतील.