जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, संजय राऊत यांची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी सोलापूर दौरा आहे. या दौऱ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, त्यांना व्यापक राष्ट्रहीत, जनहित याबाबत त्यांना काहीही पडलेले नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी हे 12 जानेवारी रोजी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. आठवडाभरातच ते सोलापुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले. जिथे राजकीय फायदा आहेत तिथेच पंतप्रधान जातात. मणिपूरात लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते तिथे जाऊन थांबले असते असे राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत म्हणून त्यांचे या दोन राज्यांवर जास्त लक्ष आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये कोट्यवधींचे करार झाल्याचा दावा केला. यावरही संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक शैलीत टीका केली आहे. दावोसची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यात जी गुंतवणूक पळवून नेली आहे ती परत आणली तर मुख्यमंत्र्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल, असे राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले की, “अनेक प्रकल्प गुजरातला गेले. आजही मुंबईला ओरबाडण्याचे काम सुरू आहे. दावोसचे आकडे खूप मोठे आहे, मात्र आमच्यासमोर एकच आकडा आहे तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातील 8 हजार कोटींचा अँम्ब्युलन्स घोटाळा. जर यामुळे मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील तर हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. “