बाबरीचे घुमट कोसळताना पळून जाणारे आम्हाला कसले चॅलेंज करतायत!

राम मंदिराच्या मुद्दावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. बाबरीचे घुमट कोसळत असताना पळून जाणारे आम्हाला कसले चॅलेंज करत आहेत, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की,  बाबरी कोसळत असताना, ही लोकं तेव्हा आमचा अयोध्या लढ्याशी संबंध नाही, आम्ही बाबरी पाडली नाही असे म्हणत होती. तेव्हा माननीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली की ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचे खापर भाजपने डरपोकपणाने, घाबरून शिवसेनेवर फोडलं. ती जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली, तेव्हाच कळाले की हिंदुत्वाच्या बाबतीत व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण.

फडणवीसांनी टीका करताना म्हटले होते की, तुमच्या छातीवर चढून मंदीर बनवलं. 22 जानेवारीला हिम्मत असेल तर अयोध्येत या, आम्ही रामाचा मंदीर काय आहे ते दाखवू, याचा समाचार घेताना राऊत यांनी म्हटले की, बाबरीचे घुमट कोसळत असताना पळून जाणारे डरपोक आम्हाला कसले चॅलेंज करत आहेत. तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली, तुमची हिंमत कुठे गेली होती. सत्तेमुळे आता तुमची छाताडं फुगली असतील, मात्र तेव्हा तुमची छाताडं कुठे होती; जेव्हा बाळासाहेबांनी संपूर्ण लढ्याची जबाबदारी घेतली होती. त्याकाळी तुमची मनगटेही पिचलेली होती आणि छाताडेही पिचलेली होती. त्यामुळे आम्हाला सत्तेचा माज दाखवू नका.

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी छापण्यात आलेल्या पोस्टरवरून टीका करताना राऊत यांनी म्हटले की, “नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामाचे बोट धरून ते मंदिरात नेत असल्याचे दाखवणारी पोस्टर भाजपने छापली आहेत, हा निर्लज्जपणा आहे. कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावणारे हे पोस्टर आहे. आम्ही सामान्य रामभक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यात उतरलो होतो. आजचे हे व्हीआयपी कुठे होते, ते त्यावेळी ढुंगणाला पाय लावून पळून गेले होते. आमचा अयोध्या लढ्याशी संबंध नाही, आम्ही बाबरी पाडली नाही असे तेव्हा हे म्हणत होते, तेव्हा माननीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली की ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचे खापर भाजपने डरपोकपणाने, घाबरून शिवसेनेवर फोडलं. ती जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली, तेव्हाच कळाले की हिंदुत्वाच्या बाबतीत व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण. “