रोखठोक – महाराष्ट्रात व्हायब्रंट गुजरात, ‘मारू मुंबई’चा धोका!

मुलुंडमध्ये मराठी कुटुंबास जागा नाकारली, ‘मारू घाटकोपर’ असे बोर्ड झळकले. मुंबईत ‘व्हायब्रंट गुजरात’चे सोहळे झाले, त्यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील उद्योगपतींनी गुजरातला यावे असे आवाहन केले. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री  यांना काही वावगे वाटले नाही, हे आश्चर्यच आहे. मुंबईचे ओरबाडणे आता नित्याचेच झाले. एक दिवस हे लोक मुंबईच पळवून नेतील. त्यासाठी मराठी लोकांत फूट पाडण्याचे कारस्थान पूर्ण झाले आहे!

मुंबईवर हक्क सांगण्याची आगळीक गुजराती लोकांनी पुन्हा सुरू केली. हे सर्व ठरवून चालले आहे. दिल्लीवर गुजराती राज्य सुरू झाल्यापासून देशभरातील आर्थिक नाडय़ा गुजराती व्यापाऱयांच्या हाती गेल्या व ते पैशांच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत आपला हक्क सांगू लागले. यामुळे ‘भारत विरुद्ध गुजरात’ असा नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. मुलुंड येथे देवरुखकर या मराठी दांपत्यास इमारतीत प्रवेश नाकारला. मराठी लोकांना आमच्या सोसायटीत जागा मिळणार नाही असे श्रीमती देवरुखकर यांना सांगण्यात आले. चार दिवसांपूर्वी घाटकोपर येथे गुजरातीत फलक झळकले की, ‘मारू घाटकोपर’ म्हणजे आमचे घाटकोपर. हे फलक नंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकले. परळ, लालबाग, गिरगाव, दादर अशा मराठी वस्त्यांतील चाळी-गिरण्यांच्या जागेवर टावर्स  उभे राहिले. तेथे मराठी माणसाला प्रवेश नाही, मांसाहारी लोकांना प्रवेश नाही, असे सांगणे हा क्षत्रियांचा, मराठय़ांचा अपमान आहे. मुंबईची लढाऊ संस्कृती बदलण्याचा हा प्रकार आहे. मुंबई आज महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, पण उद्योग, आर्थिक व सांस्कृतिकदृष्टय़ा ती गुजरातच्या दिशेने निघाली आहे. मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये, मराठी माणसाला मुंबईतून कोणतेही बळ मिळू नये याची जय्यत तयारी दिल्लीतील गुजरातचे राज्यकर्ते करीत आहेत व महाराष्ट्रात शिंदे, अजित पवार, फडणवीस अशी मराठी माणसे त्या कटाला हातभार लावीत आहेत.

दोन संस्थाने

छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्रात जन्मास आले व औरंगजेब गुजरातमधील ‘दाहोद’मध्ये जन्मास आला. गुजरातवर सतत मोगलांनी राज्य केले व नंतर गायकवाड, म्हणजे मराठा सरदारांनी मुसलमानी सत्तेचा पराभव करून मराठा साम्राज्य गुजरातेत प्रस्थापित केले. जुनागढ हे गुजरातमधील मोठे संस्थान. जी दोन संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात सामील व्हायला तयार नव्हती त्यात हैदराबादचा निजाम आणि जुनागढचा नवाब होता. जुनागढ गुजरातचा भाग होता. त्यामुळे आजही तेथे जुनागढ संस्कृती उसळत असते. 1992 च्या हिंदू-मुसलमान दंगलीत शिवसेनेने म्हणजे मराठी माणसाने गुजरात्यांचे रक्षण केले. त्यांचा व्यापार, लेकी-सुना वाचवल्या. याबद्दल त्यांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली आहे. 2014 साली दिल्लीत मोदी-शहांचा उदय होताच ही कृतज्ञता नष्ट झाली. मुंबईस ओरबाडणे जोरात सुरू झाले व आता तर त्या ईर्षेने टोक गाठले. मुंबईतील अनेक उद्योग, व्यापारी केंद्रे गुजरातेत हलविण्यात आली व महाराष्ट्राच्या ‘शिंदे-पवार-फडणवीस’ या राज्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. ही महाराष्ट्राच्या अध:पतनाची सुरुवात आहे.

मराठीचा प्रभाव

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे व त्या मुंबईवर मराठी प्रभाव आहे. हा प्रभाव पुसायचा असेल तर मराठी माणसाचे नेतृत्व करणाऱया शिवसेनेस ‘तोडा’ हे धोरण दिल्लीने अमलात आणले. मुंबईचा लचका तोडला जात असताना प्रतिकारासाठी कोणी शिल्लक राहू नये यासाठी लढणाऱयांच्या जमाती नष्ट करा व लढणाऱयांत फुटीची बीजे टाका. “मुंबईवर मराठय़ांनी कधी राज्य केले नाही, गुजरातने मात्र राज्य केलेले आहे,” असा प्रचार काही लोक करतात. मुंबईवर इतिहासकाळात राज्य करणारे गुजराती म्हणजे हे मुसलमान सुलतान होत, पण त्यांचेही कर्तृत्व असे की, फिरंग्यांच्या हल्ल्यांना कंटाळून त्यांनी मुंबई फिरंग्यांना देऊन टाकली. सन 1534 साली बहादूरशहा बेगडाने हा करार केला. दुसऱयाचा माल तिसऱयाला देऊन स्वत:चा जीव वाचविण्याची दलाली या गुजराती सुलतान बेगडाने घेतली. मराठी राज्यकर्त्यांनी प्रथम प्राण दिले, तेव्हाच मुंबई शत्रूंना घेता आली. मुंबईसाठी मराठे आपले रक्त सांडतात हा इतिहास आहे.” आता मुंबई पुन्हा व्यापारी मार्गाने पैशाच्या बळावर मराठी माणसाकडून खेचून घेतली जात आहे.

सर्व काही एकाच राज्यात

महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक संस्था व साधनांवर गुजराती लोकांनी ताबा मिळवला. देशातील इतर राज्यांतही हे असेच घडते. लहानातले लहान ‘ठेके’ही गुजरातच्याच व्यापाऱयास मिळावेत हे पाहिले जाते. उत्तर प्रदेश हे राज्यही त्यास अपवाद नाही. पंतप्रधान मोदी वाराणसी लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. वाराणसीत सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांचे ठेकेदार गुजरातचेच आहेत. देशातला सर्व पैसा एकाच राज्यात नेण्याचा हा प्रयत्न एकता आणि अखंडतेला तडे देणारा आहे. जगभरातून जे राष्ट्राध्यक्ष किंवा पाहुणे येतात त्यांना आधी गुजरात दर्शनासाठी नेले जाते. मुंबईचे तर आता नावच घेत नाहीत. मुंबई आर्थिकदृष्टय़ा कमजोर करायची, राजकीयदृष्टय़ा बिनकामाची ठरवायची. मुंबईवर मराठी माणसांचा कोणताही हक्क ठेवायचा नाही यासाठी हे सर्व सुरू आहे.

वैभव कोणी वाढवले?

मुंबईचे वैभव आम्ही वाढवले असे आज काही लोक सांगतात. ते सर्व ‘मारू मुंबई’चे समर्थक आहेत. ‘मारू मुंबई’ हा मुंबईवर ताबा मिळविण्याचा आणखी एक छुपा हल्ला आहे. प्रश्न इतकाच आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष आता काय करणार? संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा प्रामुख्याने मुंबईसाठीचा लढा होता व त्यात मराठी माणसाचेच बलिदान झाले. मुंबई महाराष्ट्राला मिळूनही मुंबईच्या आर्थिक नाडय़ा मराठी माणसाच्या हाती राहिल्या नाहीत. अडीचशे गिरण्यांतील तीन लाखांवर कामगार हेच मराठी संस्कृतीचे भांडवल. याच कामगारांनी मुंबईची कवचकुंडले बनून मराठी अस्मितेचे रक्षण केले. आज ती कवचकुंडले उरली नाहीत व उरलेल्या मराठी लोकांत ‘फूट’ पाडण्याचे कारस्थान पूर्णत्वास गेले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले. ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’चे नेतृत्व त्यांनी मुंबईत केले. मुंबईतील उद्योगपतींनी गुजरातला यावे असे आवाहन त्यांनी केले. ‘गेटवे टू द फ्युचर’ असे वर्णन त्यांनी मुंबईत येऊन गुजरातसाठी केले. महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातकडे वळविण्याच्या या कार्पामाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना काही वावगे वाटले नाही, हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, त्यात गुजरातचे हे ओरबाडणे नव्याने सुरू झाले. मुंबईतील उद्योगपतींनी इतर राज्यांतही गुंतवणूक करावी यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही, पण मुंबईची लूट करून ती लूट एकाच राज्यात नेणे हे धक्कादायक आहे. ‘मारू घाटकोपर’, ‘मारू मुलुंड’नंतर आता ‘मारू मुंबई’ आणि ‘मारू महाराष्ट्र’पर्यंत ही वळवळ सरकू नये.

महाराष्ट्राच्या विद्यमान राज्यकर्त्यांकडे कपाळ फोडून उपयोग नाही. महाराष्ट्रालाच कंबर कसून उभे राहावे लागेल!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]