गुजरात विद्यापीठ मानहानी प्रकरण – संजय सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मद्य घोटाळा प्रकरणी जामीन अर्जावर बाहेर असणारे आपचे खासदार संजय सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुजरात विद्यापीठ मानहानी प्रकरणात संजय सिंह यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. संजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुजरात येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेला रद्द करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भात सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून हा खटला सुरू झाला होता.

गुजरात विद्यापीठाने पंतप्रधान मोदी यांच्या पदवीसंदर्भात संजय सिंह यांनी गुजरात विद्यापीठावर केलेल्या वक्तव्यावरून मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सिंह यांना वारंवार समन्स पाठवले होते. त्यामुळे हा खटला रद्द करण्यासाठी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर झालेल्या सुनावणीत संजय सिंह यांच्याकडून युक्तिवाद करणाऱ्या रेबेका जॉन यांनी म्हटलं की, संजय सिंह यांनी जे वक्तव्य गुजरात विद्यापीठासंदर्भात केलं, त्यात मानहानीसारखं काहीही नव्हतं. व्हिडीओवरूनही हे स्पष्ट होतं की त्यात विद्यापीठाचा अवमान होईल, असं काहीही बोललं गेलेलं नाही. गुजरात विद्यापीठाने खोटी पदवी बनवल्याचंही कुठे म्हटलं गेलेलं नाही, असा युक्तिवाद सिंह यांच्यातर्फे करण्यात आला. पण, हा युक्तिवाद न्यायदंडाधिकारी न्यायालयात करणं योग्य ठरेल असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.