सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सातारा जिह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सातारा शहरासह जिह्यातील कराड, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव तालुक्यांत जनतेने उत्स्फूर्त बंद पाळून राज्य सरकारचा धिक्कार केला. वडूज, दहिवडीत सरकारविरोधात मोर्चे काढले गेले, तर फलटणमध्ये नाना पाटील चौकात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. बंददरम्यान कुठेही अनुचित प्रकार झाल्याचे वृत्त नाही.

लाठीहल्ल्याची सरकारची कृती जिव्हारी लागली असून, जनतेच्या मनातील खदखद आजच्या ‘जिल्हा बंद’मधून उत्स्फूर्तपणे व्यक्त झाली. सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, औंध, फलटण, कोरेगाव, खंडाळा तसेच जावली तालुक्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. ‘बंद’मुळे जिह्यात एसटी बससेवाही बंद ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सातारा शहरात सकाळपासूनच सन्नाटा होता. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने आज उघडली गेली नाहीत. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडल्यासारखे दिसत होते. एसटी सेवा बंद राहिल्यामुळे प्रवासी सातारा बसस्थानकात अडकून पडले होते. सकाळी माजी नगरसेवक अण्णासाहेब मोरे यांनी कार्यकर्त्यांसह गोडोलीत काळय़ा फिती बांधून निषेध आंदोलन केले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बापू क्षीरसागर, शरद काटकर यांच्यासह पदाधिकाऱयांनी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांना निवेदन दिले.

आज वाईवरून सातारला पायी मोर्चा

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज वाई ते सातारा निषेध पायी मोर्चा काढला जाणार आहे. वाई येथील गणपती घाटावरून मोर्चाची सुरुवात होणार असून, सातारा येथे पोहोचून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले जाणार आहे. महाबळेश्वरमध्येही उद्या तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर एसटी बससेवाही बंद ठेवण्यात आल्यामुळे कायम गजबजलेल्या सातारा बसस्थानकात असे चित्र होते. (छाया – गजानन चेणगे)

कोरेगावात मूक मोर्चा

कोरेगाव शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी पूल, जुना मोटार स्टॅण्ड, कोरेगाव पोलीस स्टेशन, मुख्य बाजारपेठ, तहसील कार्यालय या मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. खटाव तालुक्यातील वडूज येथे हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून धरणे आंदोलन केले. बावधन (ता. वाई) येथे सकाळी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा वाई तालुक्याचे पदाधिकारी, विक्रम वाघ, किशोर भोसले, मदन पिसाळ आदी उपस्थित होते. लोणंद येथे सकाळी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष शुभम दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली.

मेढा-महाबळेश्वर रस्ता रोखला

जावळी तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या मेढा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मेढा-महाबळेश्वर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. मेढा आणि कुडाळ येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना निवेदन देण्यात आले.

फलटणमध्ये ‘चक्का जाम’

फलटण येथे आज सकाळी सुमारे दोन तास मराठा क्रांती मोर्चाचे फलटण तालुका समन्वयक माउली सावंत यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील चौकात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. ‘चक्का जाम’ आंदोलनानंतर प्रांताधिकाऱयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.