शेअर बाजार गडगडला, 12 लाख कोटी बुडाले!

शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 73 हजारांखाली गेला तर निफ्टीतही 1 टक्क्याची घट पाहायला मिळाली. हा डिसेंबर 2022 नंतरचा स्मॉल कॅप इंडेक्समधील सगळ्यात मोठी घसरण असलेला दिवस मानला जाऊ शकतो. कारण, स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 5 टक्के तर मिडकॅपमध्ये 3 टक्के इतकी घट झाली आहे. तर मायक्रो कॅप आणि एसएमईवर देखील 5 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. तर बीएसईच्या सूचीबद्ध शेअर्सच्या भांडवल बाजारात 12 लाख कोटींची घट झाली असून सध्या हा बाजार 374 लाख कोटींवर स्थिरावला आहे.

निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांपैकी पाचमध्ये घसरला आहे, ही गुंतवणूकदारांसाठई चिंताजनक बाब आहे. हे सलग दुसरे सत्र आहे, ज्यामध्ये निफ्टी निर्देशांकात 2 टक्के किंवा त्याहून अधिक घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मंगळवारच्या घसरणीमुळे निफ्टी निर्देशांक उच्चांकावरून 1,500 अंकांपेक्षा अधिक खाली पोहोचला आहे. 8 फेब्रुवारीत निफ्टीचा उच्चांक 16,691 होता, त्यावरून आता 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.