भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, शरद पवार यांचा इशारा

ईडी, सीबीआय व अन्य एजन्सीजचा वापर करून नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत तेच घडले आहे. इंडिया आघाडी म्हणून आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू; पण याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी दिला.

बारामतीत गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. Sharad Pawar म्हणाले, ‘झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडवला गेला. आता केजरीवाल यांच्याबाबत तो घडला. त्यांना सात ते आठ वेळा समन्स पाठवली गेली. आणि गुरुवारी रात्री अटक झाली. मद्य धोरणाबद्दल त्यांना अटक केली. वास्तविक प्रत्येक राज्यात हे धोरण असते. दिल्लीत केजरीवाल यांनी त्यासंबंधी पॉलिसी तयार केली होती. तो अधिकार मंत्रिमंडळाला निश्चित आहे. त्यात काही चुकले असेल, तर लोकांसमोर जात निवडणुकीत तो प्रश्न उपस्थित करायला हवा होता. काही गैर असेल, तर त्यासाठी न्यायालयात जायला हवे होते. परंतु, तसे न करता अटक केली गेली. त्यांच्या दोन मंत्र्यांनाही यापूर्वी अटक झाली. राज्याच्या प्रमुखाने धोरणे ठरवली म्हणून त्याला अटक करणे हे अतिशय चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा इथपर्यंत भाजप पोहोचली आहे. पण, इंडिया आघाडी केजरीवाल यांच्यासोबत असेल. भाजपला याची किंमत मोजावी लागेल.’

तामिळनाडूतील एका मंत्र्यावर आरोप झाले. न्यायालयात त्याचा निकाल झाला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथच दिली नाही. एका राज्याचे राज्यपाल शपथ द्यायची नाही, हे कसे सांगू शकतात, त्यांना दिल्लीवरून कोणी तरी सांगितले असावे, असा सवाल करून पवार म्हणाले, ‘घटनेने दिलेले राज्यांचे अधिकारच राबवू दिले जात नाहीत. ठिकठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करून सत्ता हाती ठेवायची, असे सुरू आहे.’

अंदर रहू या बाहर, माझं आयुष्य राष्ट्राला समर्पित! केजरीवालांचे हुकूमशाहीविरोधात लढय़ाचे ऐलान

या देशात काही अपवाद वगळता निवडणुका नेहमीच मोकळेपणाच्या वातावरणात पार पडल्या. परंतु, मोदींचे सरकार आल्यानंतर यावेळची निवडणूक मोकळ्या वातावरणात होईल का, याबद्दल शंका असल्याचे पवार म्हणाले. आणीबाणीच्या काळात लोकांनी जशी सामुदायिक शक्ती दाखविली, तसे ते आता दाखवतील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

काँग्रेसबाबत टोकाची भूमिका

देशात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एजन्सीजचा वापर केला जात आहे. काँग्रेसची बँक खाती निवडणूक कालावधीत गोठवली गेली. त्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा संकटात आली आहे. छपाई, प्रवास व बाकीच्या सुविधा थांबल्या आहेत. देशातील एका महत्त्वाच्या पक्षाला प्रचार करण्यासाठी साधनसामग्रीच उपलब्ध होऊ द्यायची नाही, अशी टोकाची भूमिका घेतली गेली आहे, असे शरद पवार म्हणाले.

माढय़ात जानकरांना उमेदवारी द्यावी ही माझी इच्छा

माढय़ाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना द्यावी, अशी माझी इच्छा आहे. परंतु, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. त्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले.

राज्याच्या प्रमुखाने धोरणे ठरवली म्हणून त्याला अटक करणे हे अतिशय चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करण्यापर्यंत भाजप पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)