भाजपने जागावाटपात मिंध्यांना आणला फेस; ठाण्याच्या जागेसाठी ‘ईडी’ची खेचाखेची, महायुतीकडून दररोज नवीन नावाच्या पुड्या

thane lok sabha constituency

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या जागेसाठी महायुतीकडून दररोज नवीन नावाच्या पुड्या सोडल्या जात असताना ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी ‘ईडी’ अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खेचाखेची सुरू आहे. दरम्यान, या जागेसाठी भाजपने मिंध्यांच्या तोंडाला फेस आणला असल्याने उमेदवार जाहीर करण्यात अडचणी येत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत खासदार राजन विचारे यांच्यासमोर तोडीस तोड उमेदवार मिंधे आणि भाजपला अजून मिळालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात चांगलीच गोची झाली आहे. त्यातच भाजपचा ठाण्याच्या जागेवर डोळा असल्याने येथून कमळावर उमेदवार देण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायला काही दिवस राहिले असतानादेखील निर्णय होत नसल्याने मिंधे गटाच्या तोंडाला फेस आला आहे. भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर मिंधे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून वारंवार दावा केला जात असल्याने मिंधे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा सुरू आहे.

सरनाईकांनी मागितली गुन्ह्यांची माहिती

एकीकडे माजी खासदार संजीव नाईक यांना भाजपने तयारीला लागा असे सांगितल्यावर नाईक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. त्यामुळे मिंध्यांनी सरनाईकांना पुढे करून भाजपच्या नाईकांना शह देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ठाणे लोकसभेची जागा मिंधे गटाच्या हातातून सुटणार की भाजप आपल्या पदरात पाडून घेणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.