…मग धर्मवीर चित्रपटाच्या निर्मात्यावरही गुन्हा दाखल करा! संजय राऊत यांची मागणी

शिवसेनेचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवी यांना जो आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या आरोपाखाली अटक झाली तोच शब्द ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी तसाच्या तसा आहे. सेन्सॉरनेही तो कापलेला नाही. मग दत्ता दळवींनी तो वापरला तर गुन्हा कसा? असा सडेतोड सवाल करतानाच, तसे असेल तर ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या निर्मात्यावरही गुन्हा दाखल करा, अशी जोरदार मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केली. दत्ता दळवी यांच्या विधानाचे आपण समर्थन करत असून शिवसेना आणि सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी दिला.

दत्ता दळवी यांना अटक केल्याचे समजल्यानंतर संजय राऊत भांडुप पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘‘खून, खुनाचा प्रयत्न अशा गुह्याखालचा आरोपी आहे आणि तो पळूनच जाणार आहे अशा पद्धतीने पोलिसांनी आज दत्ता दळवी यांना घरात घुसून अटक केली. दत्ता दळवी यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना भांडुपमधील एका मेळाव्यात व्यक्त केल्या हाच त्यांचा गुन्हा आहे का?’’ असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

नारायण राणे, अब्दुल सत्तारांविरुद्ध गुन्हा का नाही?

संजय राऊत यांनी यावेळी नारायण राणे आणि अब्दुल सत्तार यांचीही उदाहरणे दिली. ‘‘काही दिवसांपूर्वी नारायण तातू राणे आणि त्यांची दोन नेपाळी पोरं भांडुपच्या गाढव नाक्यावर आली होती. त्यांनी भाषणात मला शिव्या घातल्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अत्यंत घाणेरडय़ा शब्दांत शिवीगाळ केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का? मंत्री आहेत म्हणून गुन्हा दाखल केला नाही का?’’ असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला. भाजप आणि गद्दार हृदयसम्राट गटाचे अनेक नेते शिव्या घालताहेत, पण त्यांना अटक नाही किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत, याकडेही त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

सरकारवरील टीकेवरून लक्ष हटवण्यासाठीच कारवाई

‘‘महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गद्दार हृदयसम्राट मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री बाहेर प्रचाराला फिरत आहेत. त्यांच्यावर टीका होत आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली,’’ असा थेट आरोपही संजय राऊत यांनी केला.

वीर सावरकर, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा!

‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गद्दार हृदयसम्राट एकनाथ शिंदे हे स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदू आणि जनतेचा आक्षेप आहे. गद्दार हृदयसम्राटांनी स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेणे हा हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा,’’ असे संजय राऊत म्हणाले. ‘‘दत्ता दळवी यांनी शिवसैनिक या नात्याने जोशपूर्ण भाषण केले. आनंद दिघे असते तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने पह्डून काढले असते, असे ते भाषणात म्हणाले. त्यावेळी त्यांनी ‘तो’ शब्द वापरला. ‘तो’ शब्द आक्षेपार्ह असेल तर ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते, प्रायोजक आणि कलाकारांवर सरकारने गुन्हा दाखल का केला नाही? ‘तो’ शब्द दत्ता दळवी यांनी गद्दार हृदयसम्राटांसाठी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते?’’ असा सडेतोड सवाल संजय राऊत यांनी केला.