वरुणराजा रुसल्याने अन्न–धान्य टंचाईचे राज्यावर संकट, महाराष्ट्रात खायचे वांदे!

राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे राज्यात यंदा अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याची भीती कृषी खात्यातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. परिणामी शेतकऱयांची क्रयशक्ती कमी होऊन कर्जफेडीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या कृषी विभागाने पीक पेरणी व पीक परिस्थितीचा आढावा घेतला. त्यातील आकडेवारीवरून राज्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या संकटाची चाहूल लागत आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे 1 जून 2023 ते 24 ऑगस्ट 2023पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीबाबतचा पीक पाहणी अहवाल तयार केला आहे. या अहवालातून वरील माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत सरासरी 759.9 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर प्रत्यक्ष 658.7 मि.मी. पाऊस पडला असल्याची माहिती या वेळी समोर आली आहे. तर 1 जून ते 24 ऑगस्टपर्यंतच्या एकूण कालावधीच्या 53 दिवसच 2.5 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्रात जून आणि जुलै या महिन्यांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱयांचे हातचे पीक निघून गेल्याचे पाहता या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

पीक पेरणीची परिस्थिती

राज्यात यंदाच्या वर्षी 139.11 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण 140.77 लाख हेक्टर इतके होते. तर गेल्या पाच वर्षांची सरासरी लक्षात घेता हे प्रमाण 142.00 लाख हेक्टर क्षेत्र इतके आहे.

– एकूण 21 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के पाऊस पडला आहे. यात नाशिक (5), नंदुरबार (1), नगर (4), पुणे (3), सातारा (2), सांगली (2), कोल्हापूर (1), बुलढाणा (1), अकोला (1), अमरावती (1) जिह्यांचा समावेश आहे. तर राज्यात 89 तालुक्यांमध्ये सरासरींच्या तुलनेत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.