सावर्डे येथील शिव मंदिराच्या पायऱ्या काढल्या, कोंडमळा येथे शिवसेनेचा रस्ता रोको

मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील श्रीदेव शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या रस्ता चौपदरीकरणात काढून टाकण्यात आल्या. त्या ठिकाणी पायऱ्या पुन्हा बांधल्या नाहीत. वारंवार मागणी करुनही ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोंडमळा येथे इगल इन्फ्रा कंपनीसमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक तिरडी काढून संताप व्यक्त करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असताना सावर्डे येथील श्रीदेव शंकराच्या मंदिराच्या पायऱ्या काढण्यात आल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदिप सावंत यांनी वारंवार ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाकडे मंदिराच्या पायऱ्या करण्याबाबत मागणी केली, मात्र ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. पायऱ्या नसल्यामुळे पुढील श्रावण महिन्यात मंदिरात पूजाअर्चाही करता येणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी मंदिराच्या समोरच महाआरती केली होती.

त्यानंतर आज कोंडमळा ते सावर्डे असा रस्ता रोको केला. यावेळी ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक तिरडी काढून संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात तालुकाप्रमुख संदिप सावंत, विनोद झगडे, उमेश खताते, प्रभाकर जाधव, संभाजी खेडेकर, रवींद्र सुर्वे, लक्ष्मण कोकमकर, संदिप राणे, सागर सावंत, प्रितम वंजारे, शैलेश कांबळी, प्रवीण खेडेकर, सुनील गुरव, अनिल गमरे, अशोक पांचाळ, दिलीप कांबळी, राजेंद्र चव्हाण, कृष्णा हुमणे, विनायक वासकर, विनोद शिंदे, नयन कुळे, विवेक सुर्वे, दिलीप मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, दादा सकपाळ, सुचित शिरकर, अरविंद मेस्त्री, यश कवितके, नितीन निकम, रघुनाथ चाळके, प्रथमेश बोबसकर, विजय नेवरेकर आणि इतर शिवसैनिक झाले होते.