राहुल गांधी झिंदाबाद! ‘मोदी आडनाव’ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ‘जास्तीत जास्त शिक्षा देण्यामागचे लॉजिक काय? दोन वर्षे शिक्षेची गरज होती काय?’ असे महत्त्वपूर्ण सवाल न्यायालयाने उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळण्याचा आणि आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कपटनीतीला जोरदार दणका बसला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

‘मोदी आडनाव’ मानहानी खटल्यात सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. अहमदाबाद उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. ‘राहुल गांधी यांनी कोणत्याही समुदायाचा अवमान केलेला नाही. ते काही गुन्हेगार नाहीत. या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होऊच शकत नाही’, असे सिंघवी यांनी सांगितले. याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांचे मूळ उपनाव मोदी नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर पुर्णेश मोदी यांच्या वतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी ‘राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी असेच ‘चौकीदार चोर हैं’,’ असे वक्तव्य केले होते याकडे लक्ष वेधले. राहुल गांधीविरुद्ध या खटल्यात पुरावे असल्याचे जेठमलानी म्हणाले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत शिक्षेला स्थगिती दिली.

राहुल भेटले लालूप्रसाद यादव यांना

राहुल गांधी यांनी शुक्रवारी संध्याकाळी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. यादव यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ते पोहोचले. यावेळी त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेदेखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी राहुल यांना शुभेच्छा दिल्या.

सर्वाधिक शिक्षेची गरज होती काय?

जेव्हा प्रकरण जामीनपात्र असते तेव्हा खालच्या कोर्टाने दिलेल्या जास्तीत जास्त शिक्षेला काहीही औचित्य राहत नाही. मुळात सर्वाधिक शिक्षेची गरज होती काय? दोन वर्षांची शिक्षा दिल्यामुळेच लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदी लागू होऊ शकल्या. सत्र न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा एक दिवसही कमी शिक्षा सुनावली असती तरी राहुल गांधी अपात्र ठरले नसते, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

दोन वर्षांच्या शिक्षेनंतर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले गेले. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या अधिकारांवर बंधने आली. त्यांना निवडून देणाऱया वायनडच्या मतदारांवरही अन्याय झाला. विशेषतः अधिवेशन काळात राहुल गांधींना बाहेर राहावे लागले, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

हे प्रकरण निकाली काढण्यासाठी राहुल गांधी अर्ज करू शकतील आणि आम्ही त्यावर निर्णय देऊ. जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी राफेल प्रकरणात ‘चौकीदार चोर हैं’ या वक्तव्याबद्दलच्या अवमान खटल्यात राहुल गांधींना न्यायालयाने दिलासा दिला होता. याचा संदर्भ देताना आज सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीने जाहीरपणे बोलताना काळजी घेणे अपेक्षीत असल्याचे न्यायालयाने सांगितले.

काय आहे प्रकरण?

2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे वक्तव्य केले होते. आर्थिक घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेले निरव मोदी, ललीत मोदी यांचा यामागे संदर्भ होता.

मोदी आडनावावरून राहुल गांधींनी मानहानी केल्याचा खटला गुजरातमधील भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात दाखल केला. सत्र न्यायालयाने 23 मार्च 2023ला राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

लोकसभा सचिवालयाने तत्काळ 24 तासांत राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले.

सत्यासाठी लढत राहू!

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा योग्यच आहे. कारण आपल्या देशात कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. या प्रकरणात कुठेतरी काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या हे माझंच म्हणणं नाही तर हे प्रत्येकाला तसं वाटत होतं. सत्यासह उभं राहणं हे आता या देशात गुन्हा ठरू लागलं आहे. म्हणजे पेंद्रात बसलेल्या सरकारला तसं वाटतं आहे. पण आम्ही सत्यासाठी लढत राहू, शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. विधान भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जिलेबी भरवून अभिनंदन केले.

हा सत्याचा विजय आहे. कितीही वेळ लागला तरी सत्य जिंकतेच. मला काय करायचे आहे त्याबाबत माझ्या डोक्यात सगळे चित्र स्पष्ट आहे. काहीही झाले तरी ‘आयडिया ऑफ इंडिया’चे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. जनतेने जो पाठिंबा दिला, ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचे आभार मानतो.

काहीही झालं तरी ‘भारत’ या संकल्पनेचं रक्षण करण्याचं कर्तव्य मी कायम करत राहीन. – राहुल गांधी

तीन गोष्टी खूप काळासाठी

लपवता येत नाहीत. सूर्य, चंद्र आणि सत्य! सुप्रीम कोर्टाने जो न्यायपूर्ण निकाल दिला आहे. त्याबद्दल धन्यवाद! सत्यमेव जयते!! – प्रियंका गांधी