महाशक्तीचा रडीचा डाव, भिवंडीतून उमेदवारी जाहीर होताच बाळ्यामामा म्हात्रे यांना नोटीस, राष्ट्रवादीचे टिकास्त्र

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी जाहीर होताच एमएमआरडीएने त्यांच्या येवई येथील आर.के. लॉजिक पार्क यातील गोदामावर कारवाई केली आहे. या कारवाईच्या टायमिंगवर राष्ट्रवादीने सवाल उपस्थित केला असून हा दडपशाहीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील येवई येथील आर. के. लॉजिक पार्क यातील गोदाम बांधकामावर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएने नोटीस बजावली आहे. राजकीय दबावातून ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मात्र या सुडाच्या राजकारणाला घाबरणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार असा निर्धारही राष्ट्रवादीने व्यक्त केला.

भाजपने असंच रडत रहावे, आम्ही…

दरम्यान, भिवंडीतून उमेदवारी जाहीर होत नाही तोच 24 तासांमध्य़े बाळ्यामामा म्हात्रे यांना एमएमआरडीएने कारवाईची नोटीस पाठवल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुडाचे राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा’कडून भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळताच बाळ्यामामा म्हात्रे यांच्या गोदामांवर केलेली कारवाई ही पराभवाच्या भीतीतून महाशक्तीने खेळलेला रडीचा डाव आहे.. पण भाजपने असंच रडत रहावं, आम्ही मात्र दडपशाहीच्या विरोधात लढत राहू’, असे रोहित पवार यांनी म्हटले.