मुंबई, ठाण्याची भट्टी झाली, पारा चाळीशीपार

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, कर्जतपर्यंत सर्वत्र उन्हाची प्रचंड काहिली आहे. मुंबईचा पाराही 40वर गेला तर ठाण्यात 43 डिग्री सेल्सियस तर जिह्यात मुरबाड तालुक्यात तब्बल 43.7 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. उद्या बुधवारीही मुंबई, ठाण्यात हीच स्थिती राहील, अशी माहिती हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

गुजरात आणि राजस्थानातून उष्ण वारे मुंबई, महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. तसेच अरबी आणि हिंद महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने हवेचा दाब कमी आहे. परिणामी आर्द्रतायुक्त वारे मुंबईच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक होते. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.

शाळांना सुट्टी देण्याची मागणी

राज्यात उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या केंद्रीय मंडळाच्या तसेच खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. केंद्रीय मंडळाच्या शाळांसोबत राज्यातील ज्या शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू आहेत, त्यांना पर्यायी व्यवस्था अथवा सवलत देण्यासाठीचे आदेश बुधवारी 17 एप्रिल रोजी जारी केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली. राज्यात  सध्या  उष्माघातामुळे अनेक मुलं तापाच्या साथीने हैराण आहेत. शिक्षकसुद्धा आजारी पडले आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी ही वर्क फ्रॉम होम देऊन निकालाची सर्व कामे घरूनच पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांसाठी परवापासून सुट्टी घोषित करावी, अशी मागणी केली आहे.