जालन्यातील शहापुर येथील इंडस मोबाईल टॉवरच्या 48 बॅटर्‍या चोरट्यांनी लांबवल्या

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापूर येथील इंडस मोबाईल टॉवरच्या 48 बॅटर्‍या अज्ञात चोरट्यांनी लंपास करून 2 लाखांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे या टॉवरची सायरन सिस्टीम बंद करून चोरट्यांनी बॅटर्‍या पळविल्या आहेत. शहापूर- वडीगोद्री महामार्गावर गल्हाटी धरणाच्या चारीलगत इंडस मोबाईल कंपनीचे टॉवर कार्यरत आहे. टॉवरमध्ये लाईट गेली तर टॉवर बंद पडू नये म्हणून 48 बॅटर्‍या या ठिकाणी बसविलेल्या आहेत.

टॉवरच्या आजुबाजुने संरक्षण भिंती बांधल्या आहेत. चोरट्यांनी टॉवरच्या गेटला धक्का लागू न देता भिंतीवरुन उडया मारत आत प्रवेश केला. ज्या ठिकाणी बॅटर्‍या बसविल्या आहेत, तेथील मुख्य दरवाजा न उघडता बॅटर्‍यांना हवा मिळावी यासाठी बाजूने पत्राच्या खिडक्या बसविल्या आहेत. ती खिडकी काढून छोट्या बोगद्यातून बॅटर्‍यांच्या ठिकाणी प्रवेश केला. यातील 48 बॅटर्‍यांचे नटबोल्ट उघडून साईटला लावलेल्या पट्टया तोडून बॅटर्‍या लांबवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चोरी होऊ नये यासाठी टॉवरच्या आवारात आणि बॅटर्‍याच्या ठिकाणी सायरन कार्यन्वित आहे.

बॅटर्‍यांजवळ टॉवरच्या आत कोणीही प्रवेश केला तर तात्काळ सायरनचा आवाज कर्मचार्‍यांना येतो. परंतु सायरनचा आवाजही होऊ न देता चोरट्यांनी आत प्रवेश करत सायरनचे वायर तोडले. नंतर बॅटर्‍यांजवळील सायरनचे वायर कापल्या. चोरटे सराईत असावे, त्यामुळे त्यांनी सायरन शिताफीने बंद केले. सायरनची वायर कापून त्याची नासधुस न करता ते बाजूला करुन ठेवले. टॉवरशेजारी एक व्यक्ती शौचालयात जाण्यासाठी उठला असता टॉवरशेजारी लावलेली चारचाकी वाहन आणि एका व्यक्तीला टॉवरसमोर उभा असलेले बघितले. तो संबंधीत कर्मचारी असेल, असे समजून त्या व्यक्तीने दुर्लक्ष केले. याठिकाणी चोरी झाल्याची माहिती नागरिकांनी संबंधित कर्मचार्‍यांना दिली. तेव्हा बॅटर्‍या चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी बिट जमादार मदन गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनी टॉवरच्या संबंधित कर्मचार्‍यांनी सांगितले.