हे निर्लज्ज आणि निर्घृण सरकार उलथून टाकावंच लागेल! उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर आसूड

भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पातपुते यांनी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर पाचपुते यांना उपनेतेपद देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. यावेळी वारकऱ्यांवर, बारसूतल्या लोकांवर आणि मराठा आंदोलकांवर बेछुट लाठीमार करणारं हे निर्लज्ज आणि निर्घृण सरकार आपल्याला उलथून टाकावंच लागेल, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले.

मातोश्री येथे झालेल्या या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पाचपुते यांच्या समवेत आलेल्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही निश्चय करूनच मातोश्रीमध्ये आला आहात. मातोश्रीमध्ये म्हणजे आपल्या शिवसेना परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मला अभिमान आणि आनंद आहे की साजन सहकुटुंब, सहपरिवार शिवसेनेत आले आहेत. हा परिवार शिवसेनेत आला आहे, त्यामुळे आपला परिवार वाढतोय. अनेकांच्या पोटात गोळा आला आहे आणि तो आलाच पाहिजे. अनेकांचे डोळे पांढरे झालेच पाहिजेत. पण त्या पांढऱ्या डोळ्यांना भगव्याचं तेज आपल्याला दाखवायचं आहे. साजन मध्ये भेटले तेव्हा जुजबी चर्चा झाली. विशेष म्हणजे राजकारणात एक अशी पद्धत आहे की सत्तेच्या दिशेने सगळे जातात. आजसुद्धा तेच चाललेलं आहे. पण हा एक लढवय्या आहे, जो सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आला आहे. तिकडे खूप जणं आहेत, इतके झालेत की त्यांनाच कळत नाही की माझा कुणा म्हणू मी? सगळे उपरे, आयाराम एकमेकांच्या डोक्यावर बसले आहेत. काय होणारे त्यांचं त्यांनाच माहीत नाही. पण, साजन तुम्ही शिवसेनेत आलात, मी तुम्हाला असंच लटकवणार नाही. कारण, मी आईंना सांगितलंय की आता साजनची जबाबदारी माझी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

साजन पाचपुते यांना उद्देशून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तुम्हाला जबाबदारी दिली तर पेलणार का? श्रीगोंद्यापर्यंत फक्त मर्यादित राहायचं नाही. फक्त नगरच नव्हे तर मला वाटेल तेव्हा महाराष्ट्र पिंजून काढायला लागेल. नवीन नेतृत्व आपल्याला उभं करायचं आहे. आणि ही जबाबदारी पेलण्याची ताकद आहे, म्हणून मी तुम्हाला आज शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. आपल्याला आता सगळा महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. हा प्रवेशाचा आनंद सोहळा नक्कीच आहे, पण आपल्याला नेमकं काय करायचंय याची कल्पना तुम्हाला असायलाच पाहिजे. मी परवा जालन्यात गेलो होतो. तिथे काय घडलं ते तुम्हाला माहीत आहे. तिथे जाऊन मी आंदोलकांची भेट घेऊन आलो. एका गोष्टीचं वाईट वाटतं, संताप होतो की हे सरकार निर्घृण तर आहेच, इतकं निर्लज्ज सरकार मी तरी कधी पाहिलं नव्हतं. कारण त्यांनी जे काही केलेलं आहे, माझ्या माता-भगिनींची डोकी फोडली आहेत. ते आंदोलक हात जोडून सांगत होते की लाठीमार करू नका, तरीसुद्धा बेछुट लाठीमार केला. हवेत गोळीबार केला, अश्रुधूर सोडला. आणि आता त्यांची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

‘मी अडीच वर्षं मुख्यमंत्री होतो, तेव्हाही मराठा आंदोलन होत नव्हतं अशातला भाग नाही. तुमच्यापैकी देखील त्या आंदोलनात सहभागी असतीलच ना.. मग मला सांगा आपलं सरकार असताना तुमच्यावर लाठ्या चालवल्या गेल्या होत्या का? कधीच नाही… कारण, तुम्ही न्यायहक्कासाठी बसलेले आहात की हे सरकार सगळ्यांना संकेत देतंय की याद राखा जर कुणी न्यायहक्कासाठी आंदोलन करेल, तर आम्ही डोकी फोडून टाकू. हे सरकार आपल्याला पाहिजे? बारसूतही असाच बेछुट लाठीमार केला आणि माता-भगिनींना असं मारलं की मला सांगताही येत नाही.. खरोखर निर्घृण आणि बोलायला लाज वाटेल अशा पद्धतीने हे सरकार वागत आहे. वारकऱ्यांवरही लाठीमार केला. हे म्हणजे नुसतं, कुणी बोलायचं नाही, हम करे सो कायदा! पण, हम करे सो कायदा चालणार नाही, त्या कायद्यासकट हे सरकार आम्ही तोडून-मोडून टाकू. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे. जे अन्याय करताहेत, अत्याचार करताहेत त्यांचा राजकारणात बिमोड करून आपल्याला भगवा फडकावयचा आहे. तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा द्यायला आपण लायक ठरू. मागे जी काही अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना अजून मिळालेली नाही. मग दुष्काळाची नुकसान भरपाई कधी मिळणार, पीक करपून गेलं त्याची भरपाई कधी मिळणार, विमा कधी मिळणार, हे काही नाही, फक्त पक्ष फोडायचा आणि लोकं आंदोलनाला उभी राहिली तर त्यांना सणकून मारायचं हे काम या सरकारचं सुरू आहे. आता हे सरकार उलथून टाकावंच लागेल, तर आणि तरच आपला महाराष्ट्र आणि देश वाचेल, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.