चेन्नईची क्विक गन आज धडाडणार; आज अल्टीमेट खो-खोच्या उपांत्य लढती 

अल्टीमेट खो-खोचा दुसरा मोसम शेवटच्या टप्प्यात पोहोचला. दहा सामन्यांच्या साखळी सामन्यात चेन्नई क्विक गन्सने अव्वल स्थान संपादताना सात विजयांची नोंद केली. अवघ्या एकाच सामन्यात त्यांना पराभवाची झळ बसली होती तीसुद्धा तेलुगू योद्धाजकडून. आता उपांत्य फेरीत त्यांची गाठ योद्धाजशीच पडणार आहे. दुसरा उपांत्य सामना ओडिशा जगरनॉट्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या मोसमाचा विजेता आणि उपविजेता दोन्ही संघ अंतिम चार संघांत आहेत. त्यामुळे अल्टीमेटला नवा विजेता लाभतो की ओडिशा जगरनॉट्स आपले जेतेपद राखतो ते उद्याच कळू शकेल.

गतवर्षी ओडिशाने अत्यंत चुरशीच्या लढतीत तेलुगू योद्धाजचा 46-45 असा अवघ्या एका गुणाने पराभव करत पहिला हंगाम जिंकला होता. यावेळी गटात चेन्नईने धुमाकूळ घातला तर ओडिशाला सहा विजय नोंदविता आले. ओडिशासह गुजरात आणि तेलुगू योद्धाजनेही प्रत्येकी सहा विजय नोंदविले आहेत म्हणजेच सर्व संघांची कामगिरी जवळजवळ सारखीच झालेली आहे. अपवाद मुंबई खिलाडीज आणि राजस्थान वॉरिअर्सचा. खिलाडीजला केवळ एकच विजय नोंदविता आला, तर राजस्थानच्या योद्धय़ांना आपल्या विजयाचे खातेच उघडता आले नाही.

महाराष्ट्राच्या कर्णधारांचीच कसोटी

उद्या होणाऱ्या दोन्ही उपांत्य लढतीत महाराष्ट्राचा खरा कस लागणार आहे. कारण चारही संघांचे नेतृत्व महाराष्ट्राचे खेळाडू करत असून ही लढाई खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचीच असेल. गुजरात जायंट्सचा कर्णधार अक्षय भांगरे असून तो मुंबईतील भांडुप येथील श्री सह्याद्री संघाचा एक आघाडीचा खेळाडू आहे. सलग दुसऱ्या वर्षी तो गुजरात जायंट्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांची गाठ ओडिशा जगरनॉट्सशी पडणार असून त्याचे कर्णधारपद दीपेश मोरेकडे आहे. दीपेशसुद्धा मुंबईकर असून वांद्रय़ाच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अॅपॅडमीचा एक धडाकेबाज खेळाडू आहे. दीपेशसुद्धा ओडिशाचे दुसऱयांदा नेतृत्व करतोय. त्यामुळे पहिल्या उपांत्य लढतीत कोणता मुंबईकर बाजी मारतोय, याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.

दुसरी उपांत्य लढत चेन्नई आणि तेलुगू योद्धाजमध्ये रंगतेय आणि चेन्नईचे कर्णधारपद कोल्हापूरच्या अमित पाटीलकडे आहे. त्याने आपल्या नेतृत्वाची चमक दाखवत संघाला टॉपवर ठेवलेय. दुसरीकडे पुणेकर प्रतीक वाईकर संघाचे गतवर्षीचे अपयश धुऊन काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रतीक हा तेलुगूचा हुकमाचा एक्का आहे. तो धावला की साऱयांचीच दमछाक होते. त्यामुळे उद्या उपांत्य सामन्यात तोच संघाच्या ‘विजयाचे प्रतीक’ ठरला तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही.