वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी; दोन दिवसांत पुढील भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाचे सदस्यत्व आणि सर्व पदांचा राजीनामा दिला. सहनशक्तीचा कडेलोट झाल्याची भावना व्यक्त करत स्वपक्षीयांनी त्रास दिल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे. तसेच, माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेत पक्षातील नेत्यांकडून होणाऱया घुसमटीवर सविस्तर भाष्य केले. मोरे म्हणाले, पक्षस्थापनेपासून मनसेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पक्षवाढीसाठी महापालिका सभागृहात आणि बाहेरही कायम संघर्ष केला. मात्र, पक्षातून काही मंडळींनी सातत्याने विरोधाची भूमिका ठेवली. याचा परिणाम माझ्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनाही भोगावा लागला. वारंवार कोणत्याही कार्यक्रमांना न बोलवणे, मी कार्यक्रमाला आल्यावर तेथे पदाधिकारी थांबत नव्हते. माझ्या कार्यक्रमांना पदाधिकारी येत नव्हते. पॅम्प परिसरात सोमवारी झालेल्या कार्यक्रमाला एक पदाधिकारी आला, पण मला पाहताच स्टेजवर न चढता निघून गेला. मी असं काय केल आहे? मी काय दहशतवादी आहे का ? पक्षाचे पदाधिकारी माझ्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी दहा वेळा विचार करत असतील आणि ते माझ्याबरोबर राहणाऱया कार्यकर्त्यांना त्रास देत असतील या कारणांनीच मी ही भूमिका घेतली. त्रास देणाऱया पदाधिकाऱयांची योग्य वेळी नावे घेईन. 10 ऑक्टोबर रोजी पक्षाचे नेते अमित ठाकरे यांना सर्व हकीकत सांगितली होती. मात्र त्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. आता पुणेकर जनता माझी वाटचाल ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इतर पक्षातील ऑफर आणि हडपसर विधानसभा निवडणूक लढण्यावर मोरे म्हणाले, मला अनेक पक्षांकडून ऑफर असून त्या यापूर्वीच जगजाहीर केल्या आहेत. मला आमदार व्हायचं नसून खासदार व्हायचेय असल्याचेही त्यांनी सांगितले.