वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या चार खलाशांपैकी एक मृतदेह सापडला; बुडालेली नौकाही काढली बाहेर

वेंगुर्ले बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी शुक्रवारी सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (66) यांचा मृतदेह ही मोचेमाड समुद्रात मिळाला आहे. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू
वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांच्या शोध साठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू आहे. बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी तसेच तहसीलदार ओकार ओतारी, फिशरीजचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.

तीन खलाशी पोहून आल्याने वाचले
समुद्र किनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता (49), राजा कोल (29) व सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत. ते किनाऱ्यावर आले असून दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत.

चार खलाशी बेपत्ता, एक मृतदेह सापडला
बेपत्ता असलेल्या मध्यप्रदेश येतील चार खलाशांपैकी तीन खलाशी अद्याप बेपत्ता त्यात आझान मुनीलाला कोल (16), चांद गुलाम महम्म्द, व शिवराम कोल यांचा समावेश आहे. तर यातील चौथा रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (66) यांचा मृतदेह मोचेमाड येथे सापडला आहे.