वाढवणवासीयांचा निर्धार! जाहीर पत्रक काढले; महायुतीवर बहिष्कार, आमचे मत महाविकास आघाडीलाच!

मिंधे गटाचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदराला विरोध करणारे दलाल असल्याचे वक्तव्य एका मेळाव्यात केले होते. या वक्तव्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली असून लोकसभा निवडणुकीत महायुतीवर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हजारो मच्छीमारांना देशोधडीला लावणारा विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प मोदी सरकारने लादल्याने आम्ही कदापिही त्यांना साथ देणार नाही, असा निर्धार करीत आमचे मत हे फक्त महाविकास आघाडीलाच मिळेल असे जाहीर पत्रकच काढले आहे. या निर्णयामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांना वाढवणवासीयांची भक्कम साथ मिळणार असल्याने मिंध्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

वाढवण बंदराविरोधात गेली 15हून अधिक वर्षे स्थानिक मच्छीमारांचा लढा सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम भूमिपुत्रांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली. हे बंदर झाल्यास केवळ मच्छीमारच नव्हे तर शेतकरी, बागायतदार, डाय मेकर्स यांचे अतोनात नुकसान होणार आहे. कायद्यामध्ये बदल करून केंद्र सरकारने वाढवण प्रकल्पाला मंजुरी दिली. त्याविरोधात अनेक आंदोलने झाली. तरीदेखील मोदी सरकार बंदरासाठी हट्टाला पेटले आहे. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती व अन्य संघटना लोकशाही मार्गाने लढा देत असतानाच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी महायुतीच्या झालेल्या मेळाव्यात धक्कादायक वक्तव्य केले. ‘‘सर्वसामान्य जनतेचा वाढवणला विरोध नाही. मात्र काही विरोधक हे दलाल आहेत,’’ असा थेट आरोपच त्यांनी केला.

मिंधे गटाच्या निकम यांनी केलेल्या वक्तव्याचे संपूर्ण पालघर जिह्यात तीव्र पडसाद उमटले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी तर आज थेट जाहीर पत्रकच काढून मिंध्यांच्या बगलबच्च्यांचा जोरदार समाचार घेतला. त्यात म्हटले आहे की मोर्चे, आंदोलने, धरणे, बहिष्कार अशा स्वरूपाचा लढा देत असताना केंद्रातील भाजप सरकारने मात्र कोणतीही दाद न देता हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयापासून हरित लवादापर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवले, पण भाजप सरकारने आम्हाला न्याय दिला नाही. उलट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे बंदरविरोधकांना दलाल म्हणून संबोधत असल्याने आमच्या संतापाचा कडेलोट झाला असल्याचे नारायण पाटील यांनी म्हटले आहे.

संघर्ष समितीचे म्हणणे काय?

वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती व सहयोगी संघटनांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात भूमिका घेतली असून पालघरमधील महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही.

वाढवण बंदरविरोधी लढय़ाला पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात भूमिपुत्रांना आश्वासन दिल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार भारती कामडी यांना मतदान करण्याचा निर्णय घेत आहोत.