असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देणार! आमदार सचिन अहिर यांची ग्वाही

असंघटित कामगार आज ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आणि आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्यापैकी 96 टक्के कामगारांना किमान वेतनही धड मिळत नाही. त्यामुळे या असंघटित क्षेत्रातील शोषित कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम हाती घ्यावे लागेल. त्यासाठी आवश्यक तो लढा उभारू, अशी ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी दिली.

भारतीय कामगार सेनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या अधिपत्याखाली असलेले कारखाने आणि आस्थापनाच्या कामगार प्रतिनिधींचे दोनदिवसीय संमेलन सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच लोणावळा येथे पार पडले. त्याप्रसंगी बोलताना असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी मांडली. आज केवळ 4 टक्के कामगार संघटित असून त्यांनाच सामाजिक सुरक्षितता आणि आरोग्यविषयक हक्क कायद्याने मिळत आहेत. उर्वरित 96 टक्के कामगार असुरक्षिततेचे जीवन जगत आहेत. त्यांना संघटित करण्यासाठी संघटित क्षेत्रातील कामगार कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षाही सचिन अहिर यांनी व्यक्त केली. यावेळी युनियनचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यकर्ता संमेलनाला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, रायगड, रत्नागिरी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आदी ठिकाणाहून 175 युनियन प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, पहिल्या दिवशी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात अरविंद श्रोत्री, राजेंद्र गिरी, पेंद्रीय कामगार शिक्षण पेंद्राचे शिक्षणाधिकारी चंद्रकांत जगताप, चंदन कुमार या तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी. गावडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिक्षण विभागाचे प्रमुख-उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, उपाध्यक्ष राजन लाड, माजी नगरसेवक सुनील अहिर, संजय कदम, मिलिंद तांबडे, उत्तम गीते, अण्णा शिर्सेकर, निवृत्ती देसाई, शिवाजी काळे, साई निकम, किशोर रहाटे, आवधानी पांडे, बाळा सावडावकर, ईश्वर वाघ, वाहतूक संघटनाप्रमुख सुनील बोरकर, लोणावळय़ाचे माजी नगराध्यक्ष राजू गवळी, पुणे जिल्हा सल्लागार बबनराव भेगडे, माझगाव डॉक वर्कर्स युनियनचे दीपक यादव, अॅड. नितीन भवर, मनःशांती पेंद्राच्या स्वाती आलुरकर आदी उपस्थित होते.