वरळीतील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा निघाला 

वरळीतील डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडवरील सिद्धार्थ नगर ते वरळी गोपचार सोसायटीच्या पदपथावर गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या गाड्या पार्क केल्या जात आहेत. मात्र वाहतूक विभागाने सदर गाड्यांवर कारवाई सुरू केल्याने निर्माण झालेल्या पार्किंगच्या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेच्या शिष्टमंडळाची पोलिसांसोबत चर्चा झाली. त्यामध्ये पार्किंगच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघाल्याने येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिद्धार्थ नगर ते वरळी गोपचार सोसायटीच्या पदपथावर अनेक वर्षांपासून रहिवाशांकडून आपल्या गाड्या पार्क केल्या जात आहेत. मात्र वाहतूक विभागाने कोणत्याही सूचना न देता मनमानीपणे कारवाई सुरू केली होती. त्याच्या निषेधार्थ युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेुसार युवासेनेच्या वतीने उद्या रविवारी सकाळी वरळी नाका येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर व युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष िंशगरे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून पार्किंगच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघाला.

रविवारचे आंदोलन स्थगित 

सिद्धार्थ नगर ते वरळी गोपचार सोसायटीच्या पदपथावरील पार्किंगच्या प्रश्नावर युवासेनेच्या वतीने रविवारी सकाळी वरळी नाका येथे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र तत्पूर्वीच पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने युवासेनेच्या वतीने रविवारी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.