जालन्यात दिवसाढवळया 15 लाखांची बॅग हिसकावली; दोन चोरटे 24 तासात जेरबंद

जालना येथील औद्योगिक वसाहतीतून 15 लाखांची बॅग व जालना शहरातील बरकड हॉस्पीटलजवळून दोन लाखांची बॅग हिसकावून पळून गेलेल्या चोरट्यांच्या जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी 24 तासात दोन्ही गुन्ह्यातील चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 15 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. योगेश राजेंद्र मालोदे (रा. कन्हैयानगर, जालना) यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे.

अज्ञात आरोपी यांनी योगेश यांच्याकडील 14 लाख 20 हजार रुपये असलेली पिशवी हिसकावून नेली होती. त्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली होती.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सूचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. पथकातील अधिकारी, अमलदार हे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असतांना पथकातील अधिकारी अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी सुदाम विक्रम जाधव (रा. सुलतानपूर, ता. नेवासा जि. नगर) आणि त्याच्या साथीदारासह केला आहे.

मिळालेल्या माहितीवरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सुलतानपुर येथे जात सुदाम विक्रम जाधव या आरोपीचा शोध घेवून त्याला ताब्यात घेत 24 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीस गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार विठ्ठल भिमराव अंभोरे (रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास त्याचे राहते घरून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलसुध्दा नगर शहरातून चोरी केलेले असून त्याअनुषंगाने पोलीस ठाणे औद्योगिक वसाहत नगर येथे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी सुदाम विक्रम जाधव व विठ्ठल भिमराव अंभोरे असे दोघांनी 10 जुलै रोजी सुद्धा जालना शहरातील बरकड हॉस्पीटल जवळून सचीन शिवाजी गुडा (रा.लक्ष्मीमाता मंदीराजवळ लोधी मोहल्ला, जालना) यांच्याकडील 1 लाख 46 हजार रुपये असेलेली बॅग हिसकावुन नेली असल्याचे कबुल केले आहे.दोन्ही आरोपीच्या ताब्यातुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमधील एकुण रोख 13 लाख 30 हजार रुपये व दुसर्‍या गुन्ह्यातील 1 लाख 5 हजार रुपये असे एकूण 14 लाख 55 हजार रुपये रोख रक्कम व मोटारसायकल चोरीचे एका गुन्हयातील मोटार सायकल गुन्हयात वापरलेले 4 मोबाईल असा एकुण 15 लाख 97 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात ताब्यात देण्यात आले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचीन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळ कायटे,राम पव्हरे, भाऊराव गायके, फुलचंद हजारे, विनोद गडवे, रमेश राठोड, जगदीश बावणे, रुस्तुम जेवाळ, कृष्णा तंगे, दत्ता वाघुंडे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सचीन चौधरी, प्रशांत लोखंडे, विजय डिक्कर, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, फूलचंद गव्हाणे, कैलास खाडे, दिपक घुगे, देविदास भोजने, सुधीर वाघमारे, सतीष श्रीवास, इरशाद पटेल, किशोर पुंगळे, अंकुर थांडगे, सचीन राऊत, कैलास चेके, योगेश सहाणे, धीरज भोसले, रवी जाधव, भागवत खरात, संजय सोनवणे चालक धम्मपाल सुरडकर, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.