मनाची प्रसन्नता

>> सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर

मन प्रसन्न ठेवण्याचे अनेक मार्ग योगदर्शनात सांगितलेले आहेत.

ओंकार जप
योगाभ्यास करताना ओंकाराचा जप करावा. ओंकाराशी मन संलग्न करावे. एकाग्र करावे. ॐकार जपाने साधनेत येणारे, मनःशांतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि चैतन्याची अनुभूती होते. रोग, कंटाळा, संशय, प्रमाद, आळस, अविरती अर्थात लालसा, भ्रांतिदर्शन, भ्रम, नैराश्य, अस्थिरता हे चित्तविक्षेप असून हेच योगसाधनेतील अडथळे आहेत. हे सर्व ॐकार जपाने दूर होतात.

नातेसंबंधांमध्ये ज्या सुखदायक स्मृती आहेत, त्यांचा विचार केल्याने मनाची प्रसन्नता वाढते. नातेसंबंधात क्लेश निर्माण झाल्यास अशा सुखदायक गोष्टींबद्दल विचार करावा आणि दुःखदायक गोष्टींचे विस्मरण करावे किंवा त्याकडे दुर्लक्ष करा.

दुःखाच्या वेळी आपल्या मनामध्ये कारुण्य भाव आणावा. आपल्यापेक्षाही ज्यांची दुःखे अधिक आहेत अशा लोकांचा विचार केला तर आपले दुःख हे आपल्याला कमी वाटते.

परोपकार केल्याने मनुष्याच्या मनामध्ये एक प्रकारचे समाधान निर्माण होते. या समाधानामुळे मन आनंदित होते. पापकृती किंवा आपल्या हातून काही चुका घडलेल्या असतील तर त्यांची उपेक्षा करावी. त्यांची पुनरावृत्ती करू नये. त्या चुकांमधून शिकून पुढील आयुष्यामध्ये वाटचाल करताना त्या चुका टाळाव्यात किंवा त्या दुरुस्त कराव्यात.

प्रच्छरदन विधारणाभ्यांम प्राणस्य
प्राणायामाच्या अभ्यासाने मन सात्त्विक होते आणि मनात प्रसन्न भाव निर्माण होतो.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
भगवान कृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की आहार, विहार, व्यवहार, जागृती आणि निद्रा योग्य असेल आणि त्यासह नियमित योगाभ्यास होत असेल तर दुःखांचा परिहार होतो आणि मनुष्याला सुखप्राप्ती होते.

आहाराचा परिणामही आपल्या मनावर होतो. सात्त्विक आहाराने मन सात्त्विक होते, प्रसन्न होते. राजसी आणि तामसी आहाराचा परिणाम हा मनावर त्या आहारातील पदार्थांप्रमाणे होतो.

मनाची प्रसन्नता ठेवण्यासाठी आपण आपल्या छंदाची जोपासना केली पाहिजे. आपल्याला आनंद देणाऱया आणि त्याचबरोबर दुसऱयांना ज्यामुळे काहीही नुकसान होत नाही अशा गोष्टींची जोपासना केली पाहिजे. मित्र, परिवाराबरोबर सहलीला जाणे, हिंडणे फिरणे यामध्येही आनंद आहे.

आपण जे काम उपजीविकेसाठी करतो, ते प्रामाणिकपणे केले तर मन स्वस्थ राहते आणि चांगली झोप येते. व्यवहारामध्ये जर लबाडी आणली, अप्रामाणिकपणा केला तर झोप उडते.

योग्य वेळी झोपणे आणि उठणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण स्वप्ने अवश्य पहावीत, पण ती आपल्या आवाक्यातील असावीत. आवाक्यापलीकडील स्वप्नांचा पाठपुरावा केल्यास दुःख नशिबी येते किंवा निराशा नशिबी येते.

आपले मनोभाव, तणाव आपल्या चेहऱयावर व्यक्त होतात. हे भाव दूर करून चेहऱयावर प्रसन्न भाव ठेवल्यास, स्मितहास्य ठेवल्यास मनही प्रसन्न राहते. आपल्या इष्ट देवतेच्या प्रसन्न सुंदर मूर्तीचे ध्यान केल्याने सर्व विघ्ने आणि तणाव दूर होतात .

www.bymyoga.in