मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच, नागपूरमधील वाण धरणावर उद्या आंदोलन

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या विरोधात सकल मराठा समाजाचा राज्य सरकार विरोधात असलेला रोष दिसून येत आहे.आंदोलकांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या विरोधात रोष असल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नागापूर येथील वाण धरणावर गुरुवारी सकाळी 11 वा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

परळी तालुक्यात विविध गावात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. तालुक्यातील कान्हापुर – मोहा रस्त्यावर तसेच गाढे पिंपळगाव येथे राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला.परळी तालुक्यातील सिरसाळा येथे साखळी ठिय्या आंदोलन सुरू आहे.सरकारच्या हेकाडीपणामुळे कौडगाव हुडा – सिरसाळा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी परिसरातील समाज बांधवांचा उस्फुर्त सहभाग होता.

मराठा क्रांती मोर्चाचे परळी तहसील कार्यालयासमोर शनिवार पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.हे आंदोलन बुधवारी पाचव्या दिवशी सुरूच असून,मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम आहेत.या ठिय्या आंदोलनासाठी विविध संघटना पक्ष यांचा पाठिंबा मिळत आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केला.परळी वकील संघाने पत्र देत या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.