अहमदाबाद (साबरमती)-जोधपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार; 9 जुलैपासून सुरूवात

पश्चिम रेल्वेकडून 9 जुलैपासून अहमदाबाद (साबरमती) आणि जोधपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. या प्रवासासाठी वंदे भारत सज्ज झाली आहे. आरामदायी प्रवास आणि आरामदायी आसन , सरकते दरवाजे , वैयक्तिक वाचन दिवे , मोबाईल चार्जिंग पॉईंट्स , अटेंडंट कॉल बटणे , बायो-टॉयलेट , स्वयंचलित एंट्री आणि एक्झिट गेट्स , सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही ट्रेन जागतिक दर्जाच्या सोई आणि सुविधा पुरवते.त्यामुळे प्रवाशांमध्ये ही लोकप्रिय झाली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अहमदाबाद (साबरमती) – जोधपूर वंदे भारत एक्सप्रेस 9 जुलैपासून नियमितपणे सुरू होणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल आणि मंगळवारी धावणार नाही. गाडी क्रमांक १२४६२ अहमदाबाद (साबरमती) – जोधपूर वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबाद (साबरमती) पासून १६.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.५५ वाजता जोधपूरला पोहोचेल . त्याचप्रमाणे , परतीच्या दिशेने, ट्रेन क्रमांक 12461 जोधपूर – अहमदाबाद (साबरमती) वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस जोधपूरहून 05.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अहमदाबाद (साबरमती) येथे 12.05 वाजता पोहोचेल . ही गाडी दोन्ही दिशांना महेसाणा , पालनपूर , अबू रोड , फलना आणि पाली मारवाड स्थानकावर थांबेल . या ट्रेनमध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आहेत.