प्रत्येक कॉलेजने विनाडोनेशन प्रवेशप्रक्रिया राबवावी, युवासेनेचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

सध्या अकरावी, बारावीसह महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये अधिक पारदर्शकता यावी तसेच गैरप्रकार व पालकांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी अन्य कोणाचा हस्तक्षेप करून घेऊ नये. प्रत्येक कॉलजने विनाडोनेशन प्रवेशप्रक्रिया राबवावी; अन्यथा विद्यार्थी आंदोलन उभारू, असा इशारा युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शिक्षण उपसंचालक चौथे यांनी भरारी पथक नेमून गैरप्रकार करणाऱयांना आळा घालू, अशी ग्वाही दिली.

सध्या विविध कॉलेजमध्ये अकरावी व वरिष्ठ वर्गामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या पसंतीक्रमावरून अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. काही संघटना, व्यक्ती तसेच काही विशिष्ट शैक्षणिक क्षेत्रातील संबंधितांकडून कॉलेज प्रशासनावर दबाव आणून यादीतील आपल्या विद्यार्थ्यांची नावे घुसडण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे प्रामाणिक व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसत आहे. अनेक कॉलेजमध्ये काही प्रवेश हे व्यक्तिगत पातळीवर तसेच काही नेते आणि संघटनांच्या हस्तक्षेपातून होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय प्रवेश पातळीस अनुसरूनच विद्यार्थ्याला प्रवेश सुलभरीत्या मिळावा तसेच कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर अनामत व डोनेशन विद्यार्थ्यांकडून घेतले जाऊ नये. यासंबंधीचे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालक यांच्याकडून सर्व महाविद्यालयांना देण्यात यावे तसेच एखाद्या भरारी पथकांच्या वतीने यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, योगेंद्र माने, युवराज मोरे, शेखर बारटक्के, प्रथमेश देशिंगे, रघू भावे, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले, अक्षय घाटगे, कीर्ती कुमार जाधव, अभि दाबाडे, सानिका दामुगडे, माधुरी जाधव, प्रिया माने, सिद्धी दामुगडे, सुनील कानूरकर, नीलेश सूर्यवंशी, हृषिकेश जोशी आदी उपस्थित होते.