मोनेगिरी- काकाकुवा!

>> संजय मोने

काकाचं आडनाव कुवाडेकर. त्यामुळे काका आणि कुवाडेकर यातलं कुवा मिळून आमचा काकाकुवा तयार झाला आहे. काकाकुवा हा उत्साहाचा ज्वालामुखी आहे, म्हणजे होता. आता वय वर्ष पंचाहत्तरच्या पुढे. त्यामुळे ज्वालामुखी थोडासा शांत झालाय. असा हा काकाकुवा स्वभावत मिश्कील आणि व्यवहारी परंतु कधीही मदतीला उभा राहणारा.

मूळ नाव आता पूर्णत लोप पावलेलं आहे. आडनावाचा अर्धा भाग सुदैवाने शिल्लक आहे. काका ही पदवी मागे चिकटली. त्यालाही अनेक वर्षे होऊन गेली. पण बरेचदा आडनावाची तोडमोड होऊन कुठलीही पदवी सहसा चिकटत नाही आणि काकाचं हेच वैशिष्ट्य आहे. नाव माहीत नाही असं आधीच सांगितलं. आडनाव कुवाडेकर. त्यामुळे काका आणि कुवाडेकर यातलं कुवा मिळून आमचा काकाकुवा तयार झाला आहे. काकाकुवा हा उत्साहाचा ज्वालामुखी आहे, म्हणजे होता. आता वय वर्ष पंचाहत्तरच्या पुढे. त्यामुळे ज्वालामुखी थोडासा शांत झालाय. अर्थात हा आम्हा सगळ्यांचा कयास आहे. (तूर्तास कधी उद्रेक झाला नाही म्हणून कयास. खात्री कुणालाच देता येत नाही.)

बऱयापैकी रुंदी असलेलं शरीर. अर्थात उंची बेताचीच. भरघोस टक्कल (जुनी कृष्णधवल छायाचित्रे बघितली तर हिप्पी म्हणून कधीही अटक होऊ शकली असती असे केस पाहायला मिळतात. विषमज्वराच्या 42 दिवसांचा आजार झाला. त्यात केसांनी अज्ञात ठिकाणी स्थलांतर केलं असं काका सांगतो.) गेली काही वर्षं केसांची कमतरता मिशी आणि दाढी याने भरून काढली आहे. काकाला या वयातही कोणी अहोजाहो करत नाही. सगळे ए काका! म्हणतात. जरा जास्त परिचयाचे मित्र काकाकुवा म्हणतात. काका अगदी पक्का मध्यमवर्गीय. पण त्याची ऐट धनवंत माणसाला मागे सारेल अशी असायची. नोकरीत असूनही महिन्याच्या शेवटल्या तारखेलाही काही महाग नोटा तो कायम खिशात बाळगून असायचा. अगदी चाळीस वर्षांपूर्वीही. तेव्हा आमच्यासारख्या किंवा आमच्याहून कमी वयाच्या मुलांना महिनाअखेर भासणारी चणचण तो दूर करायचा. म्हणजे दान करायचा असं नाही. ठरलेल्या तारखेला तो दिलेले पैसे वसूल करायचा. पण पुढच्या महिन्यात मदत करायला हात मोकळा. त्यामुळे तो सगळ्यांना आपला वाटायचा. काकाकुवाची बायको दुर्दैवाने अचानक निधन पावली. मागे एक मुलगा आणि एक मुलगी ठेवून. काका जरा खच्ची झाला. का कुणास ठाऊक, पण त्याने नोकरी सोडून दिली आणि तो निवृत्त झाला. काका सकाळी फिरायला यायचा. जोरजोरात तासभर फिरायचा. काकाच्या हाताला जवळपास चाळिशीला येईपर्यंत सहावं बोट असावं अशी सिगारेट कायम असायची. पुढे एकेदिवशी काय झालं माहीत नाही, पण काकाने सिगारेट सोडली. लोक सांगतात की, आधी तो इतकी सिगारेट ओढायचा की त्याच्या घरच्यांच्या अंगालाही तंबाखूचा वास यायचा…खरं-खोटं देव जाणे. कारण आम्हाला काका परिचयाचा झाला तेव्हा हाताला विधात्याने अर्पण केलेली मूळ पाचच बोटं होती. काकाला त्या काळात दुसरं लग्न करायचा सल्ला काही जणांनी दिला.

“उद्या करतो. फक्त कुलदैवताचा फोटो, नारळ आणि हार. फारफार तर अंतरपाट आणि भटजी ओळखीचे आहेत फुकटात लग्न लावून देतील.”

“अरे! वा काकाकुवा! अजून काय पाहिजे?”

“अंतरपाटाच्या पलीकडे कोण उभं राहणार?”

“अर्थात नवरी मुलगी.”

“बरोब्बर. काय हुशार आहेस तू गजानन. चल तुझी बहीण देतोस? आहे ना! लग्नाची?”

“अरे…म्हणजे.. त्याचं काय आहे…” गजानन चाचरत पुटपुटला.

“मला बायकोपेक्षा माझ्या मुलांना आई हवी आहे. ती कोण देणार? काकाने एका फटक्यात सगळ्या प्रश्नांचा निकाल लावला.मग शेजारच्या काकू होत्या, त्यांच्याकडे क्लास लावून स्वयंपाक करायला शिकला. काका अत्यंत सुग्रास जेवण करतो अशी त्याची ख्याती आहे. या शिकलेल्या स्वयंपाकाचा त्याने फार वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला. म्हणजे झालं असं की, काकाकुवाला सांगितलेल्या अनेक स्थळांपैकी एक स्थळ त्याला पटलं. बाकी-मला बायको हवी आहे, पण माझ्या मुलांना आई हवी आहे वगैरे अटी मान्य करून एक मुलगी आमच्या काकाकुवाच्या संसारात दाखल झाली. काकाच्या लग्नाला आम्हाला निमंत्रण होतं. गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या लग्नात त्याच्या स्वतचं केटरिंग होतं. अत्यंत चविष्ट जेवण होतं, लोक तुडुंब जेवले. काका आपली दोन्ही मुलं आणि नवपरिणित वधू अशा चारजणांना घेऊन मधुचंद्र वगैरे करून आला. तो गेला होता कश्मीरला. आल्यानंतर त्याचा दुसरा संसार सुरू झाला. काकाची मुलं नव्या आईच्या प्रेमात पडली. काकाही प्रेमात येऊ लागला. पण काकाच्या बायकोच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते.

“काका! मी काय म्हणते…(काकाची बायको त्याला काकाच म्हणायची) आपण कश्मीरला गेलो होतो तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रांतातले लोक येतात, त्यांना आणणाऱया प्रवासी कंपन्या त्यांच्याच प्रांतातले पदार्थ खाऊ घालतात, म्हणजे मराठी लोकांना पोहे किंवा थालिपीठ किंवा साऊथ इंडियन लोकांना इडली, वडा नाहीतर उप्पीट आणि इतर असंच काही. जर आपण कश्मीरमध्ये त्या प्रवाशांना कश्मिरी पदार्थ खाऊ घातले तर?”

“हे सगळं कसं करणार? आणि कोण?” काकाने सवाल केला.

“आपणच! तुम्ही हो म्हणा. बाकी सगळं मी बघते. नाहीतरी तुम्ही काही म्हातारे नाही, जरी निवृत्त झाला असलात तरी.” काकीकुवा उत्तरल्या. (त्यांना काकीकुवा ही पदवी काकाच्या काकाकुवामुळे चिकटली होती.)

काकाने विचार केला आणि काकूला होकार कळवला. त्यानंतर काकाकुवाच्या आयुष्यात फेरबदल झाला. काका आणि काकू तब्बल एका महिना कश्मीरला गेले. सगळा तपास केला आणि एक प्रवासी संस्था स्थापन केली, त्याचं ब्रीदवाक्य होतं, “जिथे जाल तिथे तिथलं खा. बाकीचं विसरा.”

काकाकुवाची मुलं मोठी झाली होती. त्यांना काकाकुवा आणि काकीकुवा यांचा हा सगळा विचार आवडला नाही. म्हणजे झालं असं की, काकाकुवाचा मुलगा साधारण आमच्या बरोबरीचाच होता. तो एकदा म्हणाला,

“हे सगळं होणार नाही. नुकसानच होणार.”

काकाकुवाला हे कळल्यानंतर तो म्हणाला,

“साला माझी मुलं दुर्दैवाने मध्यमवर्गीय विचार करणारीच झाली. त्यांना तोडून टाकतो आणि काकीकुवाचं ऐकतो (काका आपल्या बायकोला काकीकुवाच म्हणायचा. एकदा कोणीतरी त्याला विचारलं, तुझ्या बायकोचं नाव काय रे? त्यावर तो म्हणाला,  बहुतेक काकीकुवा असणार आणि आता विचारलं तर उगाच भांडणं होतील. कधीतरी फावल्या वेळात विचारून घेतो. त्या माणसाने हात जोडले.) पुढे काकाकुवाची प्रवासी कंपनी गाजली. उत्तर भारत झाला, मग दक्षिण भारत झाला, पुढे भारतात सगळे प्रांत झाले. लोकांची अलोट गर्दी. काका म्हणायचा,

“साल्यांनो! कोपराला आणि तळपायाला खाज सुटते, आहे का रे कोणी खाजवून देणारा?”

काकीकुवा सगळे पदार्थ आणि त्याची उस्तवार करण्यात खूप खमक्या होत्या. त्या म्हणायच्या, “हे सगळे फिरायला येतात ना. त्यांची भूक अगदी पोटभर भागवा मग काही त्रास होत नाही.”

एकदा आम्हा सगळ्यांना काका आणि काकीकुवा जोडप्याने जेवायला बोलावलं. उत्तम जेवण. घरी न्यायला पालख्या मागवायची वेळ आली होती. सगळं झाल्यावर काकीकुवा बोलायला उभी राहिली.

“उद्यापासून आम्ही या व्यवसायातून निवृत्त होतोय. आमच्या मुलांना आम्ही काय करत होतो ते आता समजायला लागलंय.जमणार नाही असं वाटत होतं, पण त्यांचा विचार बदलला आहे. उद्या पेपरात एक जाहिरात येईल. काका! सांगा मजकूर.”

काकाकुवा उठला. घसा खाकरून म्हणाला, “मुलांच्या कंपनीत जर आवडलं तरच प्रवासाला जा. अन्यथा घरी बसा, कारण अवघे विश्वची माझे घर.”

काकाकुवाची संस्था मुलं उत्तम सांभाळतात. वर्षातून एकदा काकाकुवा आणि काकाकुवी त्यांच्याबरोबर प्रवासाला जातात, पण पूर्ण पैसे भरून. का?

“चुकलंच काही तर पार  करता आली पाहिजे. मागच्या एका प्रवासात, साबुदाणा खिचडी जमली नाही म्हणून जबरदस्त राडा केला. पोरं थरथर कापत होती.”

“काकाकुवा आणि काकाकुवी कमाल आहे तुमची!” त्यांनी आणलेल्या बेळगावचा कुंदा ओरपून खात आम्ही सगळ्यांनी त्यांना अक्षरश मुजरा केला.