यादोंकी बारात : फिर वो भूली सी याद आयी है…

>> धनंजय कुलकर्णी

असं म्हणतात, कोणतीही व्यक्ती किती काळ जिवंत राहिली याचं मोजमाप त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती वर्षं ती समाजाच्या स्मरणात राहिली यावरून होत असतं. हेच सूत्र महंमद रफीच्या बाबतीत लावायचं झालं तर आज रफीच्या स्वराशिवाय कोणतीही सिनेसंगीताची मैफल पुरी होऊ शकत नाही. त्या अर्थाने रफीचा स्वर हा अजरामरच राहणार आहे! त्याच्या स्वराची आणि गाण्यांची मोहिनी इतकी प्रचंड आहे की, आणखी शेकडो वर्षं त्यांचा स्वर रसिकांच्या हृदयात अबाधितच राहील. आज गुगलच्या जमान्यातदेखील रफीच्या स्वराचं आणि गाण्याचं स्थान अबाधित आहे. आज जगभरात कुठलाही भारतीय सिनेमाचा संगीतमय कार्पाम या स्वराशिवाय अधुरा असतो. अगदी रफीच्याच भाषेत सांगायचं तर ‘कभी ना कभी कही ना कही कोई ना कोई तो आयेगा …’ (इथे फक्त ‘आयेगा’च्या जागी ‘गायेगा’ शब्द टाकायचा!). 31 जुलै हा रफीचा स्मृतिदिन. आज रफीला आपल्यातून जाऊन 43 वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी गायलेल्या गीतांच्या एका वेगळ्या पैलूकडे नजर टाकू या.

रफीने गाणी गाताना कधीही भेदाभेद अथवा दुजाभाव केला नाही. संगीतकार कोण आहे, कोणतं बॅनर आहे किंवा आपलं गाणं कोणावर चित्रित होणार आहे याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. आजही त्यांची अशी अनेक लोकप्रिय गाणी आहेत, जी गुणी, परंतु कमी लोकप्रिय अशा संगीतकारांकडे गायली आहेत. हे सिनेमे विस्मृतीत गेले, नायक आठवत नाहीत, लक्षात राहतो तो फक्त आणि फक्त रफीचा स्वर.

नौशाद, ओपी, एसडी, रवी, एलपी यांच्याकडे गायलेली रफीची लोकप्रिय गाणी आपण नेहमीच ऐकतो. आज काही अशा गाण्यांची चर्चा करू या, ज्यांचे संगीतकार केवळ रफीच्या स्वराने काही काळाकरिता तरी उजळून गेले. रफीच्या स्वराने या संगीतकारांना आपली कारकीर्द घडवण्यासाठी मोठा हातभार लावला. या प्रतिभावान, पण काहीशा कमनशिबी आणि अप्रसिद्ध संगीतकारांचं दुर्दैव असं की, त्यांच्या चित्रपटाचं बजेटच कमी असायचं. त्यामुळे गायकांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. रफीने कित्येकदा अशा संगीतकारांकडे अगदी नाममात्र पैसे घेऊन किंवा प्रसंगी काहीही पैसे न घेता अप्रतिम गाणी गायली. रफीचं श्रेष्ठत्व इथेच सिद्ध होतं. कित्येक संगीतकारांनी रफीच्या माणूसपणाच्या आठवणी नमूद केलेल्या आहेत. रफी गायक म्हणून जितके ग्रेट होते, त्याहून अधिक श्रेष्ठ ते एक व्यक्ती म्हणून होते.

1965 साली ‘अॅडव्हेंचर ऑफ रॉबिनहूड’ या सिनेमातील जी. एस. कोहली यांच्या संगीतात गायलेले ‘माना मेरे हंसी सनम तू रशक-ए-माहताब है…’ हे एक अप्रतिम गीत रफीने गायलं होतं. याच संगीतकाराकडे ‘शिकारी’ (1965) या चित्रपटात ‘चमन के फूल भी तुझको गुलाब कहते है’ या गीताची खुमारी काही औरच होती. 1964 साली आलेल्या ‘चाचाचा’ या सिनेमात (सं. इक्बाल कुरेशी) ‘सुबहा न आये शाम न आये जिस दिन तेरी याद न आये’, ‘वो हम न थे वो तुम न थे वो रहगुजर थी प्यार की’ ही दोन गाणी रफीने काय नजाकतीने गायली होती.‘दिल का सुना साज तराना ढूंढेगा’ हे गीत ‘एक नारी दो रूप’(1972) या सिनेमाकरिता संगीतकार गणेश यांच्याकडे गायलं होतं. गणेशकडील आणखी एक गाणं ‘दिल ने प्यार किया था इक बेवफासे, दिल हमारा था हमने हारा था’ (‘शरारत’-1973) जाणकारांना आजही आठवतं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना 1961 साली पहिल्यांदा ‘छैला बाबू’ हा चित्रपट मिळाला होता. या चित्रपटात रफीने गावं अशी त्यांची खूप इच्छा होती. पण चित्रपटाचं बजेट खूपच कमी होतं. तरीही रफीला त्यांनी विनंती केली आणि रफी या चित्रपटात गाऊन गेले. जेव्हा संगीतकार त्यांना मानधन देण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी ते मानधन नम्रपणे त्यांनाच परत करून “आयुष्यभर असंच एकत्र काम करा,” असा आशीर्वाद दिला.(हा सिनेमा 1967 साली प्रदर्शित झाला.)

अशीच काही अप्रतिम गाणी जी रफीने फारशा प्रकाशात न आलेल्या संगीतकारांकडे गायली. ती गाणी पहा. ‘ये रात ये फिजाये फिर आये या न आये, आओ शमा बुझा के’ (‘बटवारा’- एस. मदन-1961), ‘अगर बेवफा तुझको पहचान जाते, खुदा की कसम हम मुहोब्बत न करते’ (‘रात के अंधेरे में’ – प्रेम धवन – 1969), ‘ढलती जाये रात सुनले दिल की बात, शम्मा परवाने का न होगा फिर साथ’ (‘रझिया सुल्तान’ – लच्छीराम -1961), ‘आंखो पे भरोसा मत कर, दुनिया जादू का खेल है’ ( ‘डिटेक्टिव्ह’- मुकुल रॉय -1958), ‘भुला नही देना जी भुला नही देना, जमाना खराब है’ (‘बारादरी’ – नौशाद – 1955), ‘नव कल्पना नव रूपसे’ (‘मृगतृष्णा’- शंभू सेन -1975), ‘अपनी आंखो मे बसाकर कोई इकरार करूं’ (‘ठोकर’- श्यामजी घनश्यामजी -1974), ‘कुहू कुहू बोले कोयलीया’ (‘स्वर्ण सुंदरी’- आदी नारायण राव -1958), ‘तुम तो प्यार हो सजना’, ‘जा जा जारे तुझे हम जान गये’, ‘तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये’ (‘सेहरा’- रामलाल-1963), ‘मै तो तेरे हसीन खयालो में खो गया’ (‘संग्राम’- लाला अत्तार सत्तार -1965)… ही यादी खूप मोठी व न संपणारी आहे. यातील प्रत्येक संगीतकार हा रफीच्या स्वराने कृतकृत्य झाला. ही गाणी गाताना रफीने बऱयाचदा एक छदामदेखील घेतला नव्हता.

रफीच्या या काहीशा अप्रसिद्ध, पण गुणी संगीतकारांकडील स्वर कर्तृत्वावर खूप काही लिहिता येईल, पण आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या या ‘रेयर जेम्स’ची छोटीशी झलक वाचकांना रफीच्या सुरिली आठवणी जागवून देईल हे नक्का.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)