सिनेमा – बॉम्बे टू गोवा

>> प्रा. अनिल कवठेकर

चित्रपट जर प्रवासाचा असेल आणि तोही धमाल करणारा, एखाद्या सहलीतील जगण्याचा आनंद अनुभवायला देणारा, मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारा तसेच वेगवेगळय़ा स्वभावांच्या माणसांना एकाच बसमध्ये पाहून पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीतील वल्लींची आठवण करून देणारा तर तो प्रवास निश्चितच स्मरणीय, आनंददायी असा होतो. असाच एक सदाबहार चित्रपट ‘बॉम्बे टू गोवा.’

जीवन हा प्रवास आहे. सुखदुःखांचा, अडचणींचा, समस्यांचा, आनंदाचा, समाधानाचा, यशाचा, अपयशाचा आणखी कशा कशाचाही पण तो एक प्रवास आहे. तसेच चित्रपट पाहणे हादेखील दोन-अडीच तासांचा एक प्रवास आहे. हाच चित्रपट जर प्रवासाचा असेल आणि तोही धमाल करणारा, एखाद्या सहलीतील जगण्याचा आनंद अनुभवायला देणारा, मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारा तसेच वेगवेगळय़ा स्वभावांच्या माणसांना एकाच बसमध्ये पाहून पुलंच्या वल्लींची आठवण करून देणारा असा प्रवास निश्चितच स्मरणीय, आनंददायी होतो. असाच प्रवासावर आधारित मेहमूद या विनोदाच्या बादशहाचा सदाबहार चित्रपट, ‘बॉम्बे टू गोवा.’

सव्वादोन तास चित्रपटाची लांबी असलेला हा चित्रपट जवळ जवळ 80 टक्के बसमध्येच शूट केलेला आहे. त्यामुळे त्या बसमध्ये घडणाऱया गमतीजमती, त्या बसमध्ये घडणारा थरार सारंच यात आहे. बसमध्ये घडणाऱया एक एक प्रसंगाचे लिखाण खरोखरच कमाल केलेले आहे. या सगळय़ा गमतीजमतीमुळे मूळ कथानकाला कुठेही बाधा येत नाही. त्या कथानकाला पकडून ठेवणाऱया विनोदी घटना या बसमध्ये घडत जातात. बसमधल्या प्रवाशांची विविधता आपण लक्षात घेतली तर बसमध्ये काहीही झाले, काहीही घडले तरी कायम झोपणारा एक प्रवासी आहे. तो क्षणभर उठून पाहतो पण त्यात तो सहभागी होत नाही. परत झोपी जातो. बसमध्ये वयस्कर ब्राह्मण आणि मुल्ला शेजारी शेजारी बसलेले आहेत. बसमध्ये संधीसाधू चोर आहे. नाटकात काम करणारी एक अभिनेत्री आणि तिची तरुण मुलगी यांचाही प्रवास त्यांच्यासोबत चालू आहे. एक बॉक्सर आणि त्याचा असिस्टंट हे दोघेही प्रवास करत आहेत. मराठी बोलणारा आणि कमी दिसणारा बसमध्ये चढतानाच दरवाजाऐवजी बसच्या बॉडीवर धडकणारा असाही प्रवासी आहे. कायम अंगात येणारी एक बाई बसमध्ये आहे. बसमध्ये चढण्यापूर्वी तिचे भक्त तिच्यासमोर लोटांगण घालतात आणि ती कायम चढताना, उतरताना, बसताना सारखी घुमत असते. बसमध्ये काही वेळेपुरता सैनिक चढतो आणि नंतर उतरतो. बसमध्ये एक दक्षिणात्य ब्राह्मण आपल्या गलेलठ्ठ मुलाला आणि बायकोला घेऊन बसमध्ये चढतो. त्यांच्यामुळेही चांगलीच धमाल उडते.

चित्रपटाची कथा अशी की, मालाला हिरोईन व्हायचे आहे. शर्मा आणि वर्मा आपण मोठे प्रोडय़ूसर आहोत असे भासवून तिला आपल्या जाळय़ात फसवतात. सध्या आपल्याकडे पैसे नसल्यामुळे तू घरातून पैसे घेऊन ये, असे मालाला सांगतात. ती घरातून पैसे घेऊन येते. पैसे त्यांच्या ताब्यात देते तेव्हा त्यांचे आपापसात भांडण होते. त्यात एकाचा खून होतो. तो खून माला पाहते आणि तिथून पळत सुटते. इथून चित्रपटाला प्रारंभ होतो. व्हिलन मंडळींची गँग तिचा पाठलाग करते, पण ती मुंबईवरून गोव्याला निघालेल्या बसमध्ये चढते आणि इथून बसमधला प्रवास सुरू होतो. अशा या प्रवासी बसचा कंडक्टर जर मेहमूद असेल तर तो काय करू शकेल याची कल्पना आपल्याला येते. चित्रपटाचे पूर्ण नियंत्रण कंडक्टर म्हणजे मेहमूदच्या हातात आहे. त्यामुळे चित्रपट कुठेही थांबत नाही. स्पीड कमी करत नाही. चित्रपट आपल्याला हसवत हसवत प्रसन्न करत जातो. मुळातच विनोदी चित्रपटातील कलाकारांच्या विक्षिप्त सवयी फार महत्त्वाच्या ठरतात आणि त्याबाबतीत हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही. त्यामध्ये संवादही तसेच आहेत. जेव्हा माला विचारते की, “इस बस का आखरी स्टॉप कौनसा है.” बसमधला एक मिश्कील प्रवासी उत्तर देतो, “बस का आखरी स्टॉप कबाडी की दुकान है.” तेव्हा मेहमूद त्याच्याकरिता जे शब्द वापरतो ते असे, “अबे पुराने चावल बस का कहा है पता नही लेकिन तुम्हारा आखरी स्टाफ तो शमशान घाट है.”

चित्रपटात एक आकर्षण म्हणून किशोर कुमारचा प्रवेश आहे आणि त्याचे एक सुंदर असे गाणेदेखील आहे. एखाद्या प्रवासात सुप्रसिद्ध गायक आपल्या बसमध्ये यावा आणि तो प्रवास अधिक सुमधुर व्हावा अशी रचना पटकथेत करून त्या प्रवासात रस्त्यात उभा असलेला किशोर कुमार दिसतो, तेव्हा बस थांबवली जाते आणि राजेश व खन्ना खाली उतरतात. येथे बस चालवणाऱया ड्रायव्हरचे नाव राजेश आहे आणि मेहमूदचे नाव खन्ना आहे. राजेश खन्ना या नावाचा अतिशय सूचक विनोदी उपयोग या चित्रपटात केलेला आहे आणि त्यासंदर्भातील खुलासा किशोर कुमारसमोर होतो. किशोर कुमारला विचारले जाते की, “आप यहां कैसे.” तेव्हा किशोर कुमार म्हणतो, “हमारी गाडी खराब होई गई.” तेव्हा राजेश उत्तर देतो, “हमारी किस्मत अच्छी थी इसलिये आपकी गाडी खराब हो गई नही तो आपके दर्शन कैसे होते.” दोघेही किशोर कुमारला भेटल्यानंतर किशोर कुमारची जी स्टाइल आहे त्याची नक्कल करत अशी काही धमाल करतात. त्या संवादांमधला तिघांचा जो टाइमिंग तो अतिशय अप्रतिम आहे आणि संवाद इतके सहज आहेत की, ते संवाद वाटतच नाहीत. त्यामुळे प्रत्येक दृश्य तुम्हाला एक सुखद आनंदाचा अनुभव देत जाते.

प्रत्येकाच्या सोबत संवाद घेताना मेहमूद त्याची जी काही मिपी करतो त्याच्या संवादाची, त्याच्या आवाजाची, त्याच्या बोलण्याची ते अगदी लाजवाब आहे. बसमध्ये कोंबडीचा आवाज आल्यावर मेहमूद ओरडतो, “बस रोको बस मे मुर्गी अलाऊड नही है” आणि कोंबडीचा शोध घेताना तो एक हसऱया चेहऱयाच्या माणसाजवळ येतो. त्याला विचारतो, “मुर्गी कहा है.” तो हसऱया चेहऱयाने खिशातून अंडे काढतो. सांगतो, “मेरे पास मुर्गी नही है ये अंडा है.” खिशात अंडा घेऊन फिरणारा एक प्रवासी पण या बसमध्ये आहे. बसमधली कोंबडी फेकून दिल्यानंतर काशीबाई जेव्हा त्यांना शाप देते, तेव्हा ते कोंबडी शोधायला निघतात आणि कोंबडी पकडण्याच्या नादात ते एक नागच पकडून आणतात व मग बसमध्ये सगळी धमाल उडते. आपल्या हातात नाग आहे समजल्यावर मेहमूदने चेहऱयावर जे भाव दाखवले ते हसवत हसवत आपल्या मनाला हळुवारपणे गुदगुल्या करतात.

काही काही प्रसंगांतून मानवी स्वभावाच्या अनेक छटा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. त्या गलेलठ्ठ मुलाचा हावरटपणा. दुसऱयाच्या हातात भजी पाहिल्यानंतर ती भजी मागणे. “आप्पा पकोडा आप्पा पकोडा” म्हणून त्याने घातलेल्या धिंगाणा त्याच्या प्रचंड आकारमानामुळे तोही गंमत निर्माण करतो. म्हणून खन्ना त्याचे तोंड बांधून ठेवतो हे सगळे आपण कुठेतरी पाहिलेले, अनुभवलेले आहे तेच छानपैकी त्या बसच्या कथानकात बसवलेले आहे. मालाची पर्स बसमधल्या चोराने चोरल्यानंतर युक्ती करून मेहमूद त्या बसचा बोर्ड बदलतो आणि ‘बॉम्बे टू गोवा’चा काढून तो ‘गोवा टू बॉम्बे’ झाल्यावर ती बस जेव्हा पुन्हा येते, तेव्हा चोर त्या बसमध्ये चढतो आणि लगेच सापडतो. हळूहळू बसमधील सगळय़ा प्रवाशांचे कुटुंब तयार होते. त्या बॉक्सरबरोबर होणारी मेहमूदची बॉक्सिंग आणि त्यात जिंकणारा मेहमूद असे अनेक छोटे छोटे किस्से या प्रवासात घडत जातात.

खरं तर या चित्रपटात अमिताभ नसता तरीही चालला असता. कारण चित्रपट खरा तर मेहमूदवर बेतलेला होता. या चित्रपटाच्या वेळी अमिताभ फारच सडपातळ असल्यामुळे खूपच उंच वाटत होता. तोही बसमध्ये चढतो. मोटार सायकल चालवत येताना दोन्ही हात सोडून तरुणाईचा त्याने दाखवलेला बिनधास्तपणा, त्याची धावण्याची स्टाइल, अभिनयातील आत्मविश्वास, संवादातला आत्मविश्वास तो नवीन असतानादेखील तसाच होता हे जाणवते व आपल्या सगळय़ांना सहलीकरिता सहलीत गाण्यासाठी मिळालेले गाणे सुरू होते. ‘देखा ना हाय रे सोचा ना रख दी निशाने पे जा…’ या गाण्याबदल असे म्हणतात की, अमिताभ हे गाणे त्यातील नृत्यामुळे करायला तयार नव्हता. म्हणून संपूर्ण चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर मेहमूदने त्या गाण्याकरिता नव्याने शूटिंग केली आणि त्यात अमिताभला वाटेल तसे नाचण्याची सूचना केली. त्यावेळी अमिताभ बच्चनने जो काही गोंधळ घातला तो पाहताना आजच्या अमिताभच्या नृत्याचा या गाण्यातील नृत्यातील वेगळेपणा जाणवतो. कारण तोपर्यंत कोणत्याच कलाकाराने अशा प्रकारचे नृत्य केलेले नव्हते.

संपूर्ण बसमध्ये पाठीवर घसरत घसरत जाणे, टपावर चढणे, दरवाज्यातून बाहेर डोकावणे, टपावरून उलटे खाली येणे सगळे सगळे प्रकार अमिताभने दणक्यात केले आहेत. शेवट गोव्याच्या कोणत्यातरी किनाऱयावर ठरल्याप्रमाणे नायक आणि खलनायकाची हाणामारी होते. या हाणामारीतदेखील सगळे बसमधील प्रवासी सहभाग घेतात. ज्याला दिसत नाही तोही अंदाजे कोणाला तरी मारण्याचा प्रयत्न करतो आणि खाण्यासाठी अकांडतांडव केलेला तो गलेलठ्ठ मुलगा त्याचा बाप घाबरत असताना तो मात्र गुंडांना सहजपणे मारतो. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये कॉमेडी कलाकार असताना हाणामारीमध्ये जी कॉमेडी असायची ती कॉमेडी इथे आपल्याला पाहायला मिळते. नंतरच्या काळात ती कॉमेडी आता पूर्णपणे बंद झालेली आहे. नेहमीप्रमाणे शेवटी राजेश, खन्ना हे दोघे पोलिसांना आणतात आणि मनाला आनंदाचे झोके देत चित्रपट संपतो.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)