रंगपट – चैतन्यदायी स्वरलहरी…!

संगीत क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणारे गायक त्यागराज खाडिलकर उलगडत आहेत, मनातल्या आठवणींचा एक कप्पा…

आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात आणि त्यांच्या काही आठवणी मनात कायम घर करून राहतात. अशीच माझी एक आठवण आहे ती ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांच्याविषयीची! एक दिवस सकाळी आधीच ठरल्याप्रमाणे मी बप्पीदांच्या बंगल्यावर पोहोचलो. वॉचमनने

इंटरकॉमद्वारे त्यांना मी आल्याची वर्दी दिली. थोडय़ाच वेळात मी त्यांच्या बंगल्याच्या प्रशस्त दिवाणखान्यात दाखल झालो. हा सगळा योग जुळून आला होता तो संगीतकार अनिल मोहिले यांच्यामुळे! बप्पीदा त्या वेळी देवआनंद साहेबांचा ‘मिस्टर प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट करत होते आणि त्यातल्या एका रॅप सॉन्गमध्ये क्लासिकल आलाप व ताना गाण्यासाठी अनिलजींनी त्यांना माझे नाव सुचवले होते.

‘डिस्को किंग’ बप्पीदांच्या त्या दिवाणखान्याला मी बसल्या बसल्या न्याहाळू लागलो. त्याची एक भलीमोठी भिंत तर प्लॅटिनम आणि गोल्ड डिक्सने भरलेली होती. ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘तोहफा’, ‘हिम्मतवाला’ ते अगदी ‘मकसद’, ‘मवाली’, ‘मास्टरजी’, ‘आज का अर्जुन’ आणि थोडय़ा अलीकडच्या काळातल्या म्हणजे तेव्हाच्या ‘घायल’, ‘सैलाब’ अशा चित्रपटांपर्यंतच्या डिस्क तिथे होत्या. ‘नमक हलाल’, ‘शराबी’ची तर मी पारायणे केली होती. ‘पग घुंगरू’ हे गाणे तर मी त्यातल्या म्युझिकसकट एकटाच संपूर्ण गायचो! कॉलेजमध्ये तर ‘याद आ रहा है, तेरा प्यार’ हे गाणे गाऊन मी बरीच बक्षिसे पटकावली. या काहीशा गूढ, बंडखोर आणि केवळ एका वर्षात संगीतकार म्हणून तब्बल 30 हिंदी चित्रपट देणाऱ्या अत्यंत यशस्वी संगीतकाराला प्रत्यक्ष बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होतो.

माझ्या प्रतीक्षेची परीक्षा घेऊन अखेर साडेबाराच्या सुमारास दादा अवतरले. किरमिजी रंगाचा सिल्कचा कुर्ता, लुंगी, डोळय़ांवर गडद गॉगल, आणि अंगावर सोन्याचे विविध प्रकारचे दागिने. या त्यांच्या ट्रेडमार्क वेशात बप्पीदा वरच्या मजल्यावरून खाली आले. त्यांना पाहताच अर्थातच मी उठून उभा राहिलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला. ‘‘अरे रहेने दो, बैठो बैठो,’’ असे म्हणत दादा माझ्यासमोर बसले. ‘‘अनिलजीने भेजा है तो अच्छाही गाते होगे. फिर भी कुछ सुनाओ,’’ असे ते म्हणाले. सकाळची वेळ म्हणून मी मनात राग अहीरभैरव ठरवून आलो होतो, पण आता मध्यान्ह झाली तरी मी तोच राग गायला. दादांच्या गॉगलआडच्या प्रतिक्रियेचा मी अंदाज घेऊ लागलो. क्षणभरानंतर ते बंगाली वळणाचे मिठ्ठास उच्चार करत म्हणाले, ‘‘अच्छे गाता है.’’ व्याकरणातला कोणताही लिंगभेद त्यांना मान्य नव्हता. एका मुलाखतीत मी त्यांना ‘‘जाब मैं छोटा बच्चा थी, ताबसे तबला बजाती था,’’ असे उत्तर देताना ऐकले होते. व्याकरणातला लिंगभेद धुडकावून लावणारा भाषाप्रभू म्हणून त्यांना एक मेडल द्यायला हवे होते, अर्थातच सोन्याचे…!

तर पुन्हा एकदा बंगाली लहेजाचे मिष्टी हिंदी बोलत तितक्याच मिष्टी स्वभावाचे दादा मला म्हणाले, ‘‘अभी खांबाज गाओ.’’ मला एक क्षण काही कळलेच नाही. ‘‘खांबाज, खांबाज…’’ असे मी मनाशी पुटपुटलो. खांबाज हा राग ऐकूनसुद्धा मला माहीत नव्हता. बहुधा त्यांना ‘खंबावती’ म्हणायचे असेल, असे समजून मी तो राग गायला. ते म्हणाले, ‘‘अच्छा था, लेकिन क्या था?’’ मी म्हटले, ‘‘राग खंबावती.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अरे, खांबाज गाओ खांबाज.’’ मग मी विचारले, ‘‘मतलब…खमाज?’’ त्यांचे उत्तर आले, ‘‘हा, वोही.’’ मग काय, मी खमाजही गायला. त्यावर त्यांनी छान दाद दिली. याचा अर्थ त्यांच्या डोक्यात खमाज रागावर आधारित काहीतरी शिजत असावे. ‘‘अच्छा है, तो कल सुभा 11 बजे ब्लू डायमंड स्टुडिओ आ जाओ,’’ त्यांच्या मुखातून शब्द उमटले.

दुसऱया दिवशी मी अगदी वेळेवर तिथे पोहोचलो. बप्पीदा वेळेआधीच पोहोचले होते. ते आणि अनिलजी त्या गाण्याच्या ट्रकचे त्यांना हवे तसे फायनल एडिटिंग, कटिंग, पेस्टिंग करत होते. त्या रॅप गाण्यात कुठे, कसे आलाप हवे आहेत ते बप्पीदांनी मला समजावून सांगितले. त्यांना हवे तसे, हवे तेवढे आलाप, ताना मी गायलो आणि त्यांच्या पसंतीची पावती मिळताच धन्य झालो. लहानपणापासून त्यांना भेटण्याचे पाहिलेले स्वप्न त्यांच्यासाठी गाणे गाऊन पूर्ण झाले होते. तितक्यात त्या स्टुडिओच्या अजस्त्र दरवाज्यात बप्पीदांची करंगळी सापडली आणि रक्ताची धार लागली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याक्षणी माझ्या मनातल्या आनंदाची जागा वेदनेने घेतली. या नंतरही अनिल मोहिलेंच्या अनेक कार्यक्रमांत मला बप्पीदांबरोबर सहभागी होता आले. प्रत्येक भेटीत ते म्हणायचे, ‘‘अभी मेरा पासही कोई काम नही हैं, नहीं तो मैं तुमसे जरूर गाना गवाती.’’ दादा तुमच्यासारख्या अत्यंत यशस्वी संगीतकाराने असे म्हणणे हे कोल्हापूर-सांगलीहून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी स्वप्नवतच होते. तुमचे चैतन्याने सळसळणारे व्यक्तिमत्त्व, वैविध्यपूर्ण संगीत आणि वेगळा, परंतु अतिशय सुरेल असा आवाज मला कायम प्रेरणा देत राहणार आहे.

 शब्दांकन : राज चिंचणकर