रंगभूमीवरचा अनुभव महत्त्वाचा

>> गणेश आचवल

मराठी रंगभूमीवर ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाचे 250 प्रयोग नुकतेच पूर्ण झाले आहेत. या नाटकात रूपल करमरकर ही व्यक्तिरेखा सिद्धी घैसास साकारतेय… एक प्रॉमिसिंग चेहरा.

सिद्धीने शाळेत असताना बालनाटय़, पथनाटय़, एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. बारावीनंतर तिने मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे मास मीडिया अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. सिद्धी म्हणते, ‘‘मला कॉलेजमधील विविध उपक्रमांत सहभागी व्हायला खूप आवडत होते. आमच्या ग्रुपला पथनाटय़ स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते. एका आंतर-महाविद्यालयीन महोत्सवात सर्वोत्कृष्ट जनसंपर्क विभागप्रमुख हे पारितोषिकदेखील मला मिळाले होते. पण त्यावेळी अभिनयात करीअर करायचे हे ठरवले नव्हते.’’

कोरोना काळात तिने योगेश सोमण यांचे व्हॉइस कल्चर वर्कशॉप, राजेश देशपांडे यांची अभिनय कार्यशाळा ऑनलाइन केली. तसेच प्रशांत दामले यांच्या ‘टी स्कूल’ या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेतही तिने प्रवेश घेतला. सिद्धी सांगते, ‘‘प्रशांत दामले यांची ही कार्यशाळा काही कालावधींसाठी ऑनलाइन, तर काही कालावधींसाठी प्रत्यक्ष झाली. तिथे खूप काही शिकायला मिळाले. मुख्य म्हणजे त्या कार्यशाळेनंतरच प्रशांत दामले यांच्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकात प्रशांत दामले यांच्या मुलीची भूमिका करण्याची संधी मिळाली. या नाटकात ही भूमिका साकारताना प्रशांत दामले सरांना ‘ए बाबा’ असे म्हणणे सुरुवातीला मला जड जात होते. या नाटकात वर्षा उसगावकरदेखील आहेत. त्यांच्याकडून तसेच लेखक, दिग्दर्शक संकर्षण कऱहाडे यांच्याकडूनदेखील खूप काही शिकता आले. प्रत्येक प्रयोग नवा अनुभव देणारा असतो. या नाटकामुळे परदेश दौरेदेखील करता आले.’’

सिद्धीने ‘ठरलं तर मग’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ अशा मालिकांमध्येदेखील काम केले आहे. सिद्धी म्हणते, ‘‘रंगभूमी हे माध्यम मला खूप आवडते, पण भविष्यात मराठी मालिकांमधून आणि काही चित्रपटांमधूनदेखील चांगल्या भूमिका करण्याचे माझे स्वप्न आहे.’’