वेब न्यूज – अंतराळात मृत्यू झाल्यास काय होते?

>> स्पायडरमॅन

जगात अनेक लोकांना काही ना काही भन्नाट प्रश्न पडत असतात. अर्थात त्या प्रश्नांच्या मागे धावल्याने जे उत्तर मिळते, ते अनेकांचे ज्ञान वाढवणारे असते. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने आता असले अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे लोकांना सहजपणे मिळवता येत आहेत आणि त्यांची बौद्धिक भूक भागवता येत आहे. जगभरातील अनेक लोकांना असाच पडलेला एक प्रश्न म्हणजे अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास त्याच्या शरीराचे काय होते किंवा काय केले जाते? नासासारख्या जगविख्यात अंतराळ संस्थेचे नियम याबद्दल अगदी स्पष्ट आहेत. नासाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या अंतराळवीराचा मोहिमेत मृत्यू झाल्यास त्याच्या टीममधील इतर सदस्यांच्या सुरक्षेला सर्वात आधी प्राधान्य दिले जाते. मुख्य म्हणजे अंतराळ मोहिमेत अंतराळवीर हे पूर्ण काळ निरोगी राहावेत यासाठी स्पेस डॉक्टरांची एक पूर्ण टीम अविरत मेहनत घेत असते. एखाद्या अपघातात व इतर काही कारणाने अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास तो ज्या स्थानावर झाला असेल, त्याप्रमाणे वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील. अर्थात, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासारख्या पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या मोहिमेदरम्यान अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास त्याचे इतर सहकारी मृतदेह कॅप्सूलमध्ये घालून काही तासांत पुन्हा पृथ्वीवर आणू शकतात. जर एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू चंद्रावर झाल्यास काही दिवसांत त्याच्या मृतदेह सहकारी पुन्हा पृथ्वीवर आणतील. मात्र मंगळ मोहिमेसारख्या एखाद्या मोहिमेत अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास तेव्हाची परिस्थिती फार वेगळी असेल. अशा वेळी त्याचे सहकारी तातडीने मागे फिरू शकणार नाहीत. अशा वेळी मोहिमेच्या शेवटी म्हणजे काही वर्षांनी हा मृतदेह इतर सहकाऱयांबरोबर पृथ्वीवर आणला जाईल. तोवर तो वेगळ्या कॅप्सूलमध्ये किंवा विशेष प्रकारे तयार केलेल्या बॉडी बॅगमध्ये जतन केला जाईल. 60 वर्षांपूर्वी मानवाने सुरू केलेल्या अंतराळ संशोधनाच्या या कार्यात आजवर 20 अंतराळवीरांचा मृत्यू झालेला आहे. नासाने ही सर्व माहिती दिली असली तरी कोणत्याही मोहिमेतून सर्वच्या सर्व अंतराळवीर सुखरूप परत यावेत हेच कायम नासाचे उद्दिष्ट होते आणि राहील असे स्पष्ट केले आहे.