निजाम राजवटीतील आंदोरा जिल्हा परिषद विद्यामंदिर शाळेची शतकपूर्ती, 75 आजी-माजी शिक्षकांचा गौरव

धाराशिव: कळंब तालुक्यातील आंदोरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय विद्यामंदिर शाळेला जून 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेचा शताब्दी महोत्सव मंगळवार दि.14 रोजी शाळेच्या मैदानात उत्साहाने साजरा करण्यात आला. आंदोरा येथील जिल्हापरिषद विद्यामंदीर शाळेची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात इ स.1923 मध्ये झाली. शतकपुर्ती निमित्ताने दि.14 रोजी शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला . सकाळी 8 वाजता गावातून ग्रंथ दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. यात भजनी मंडळ, लेझीम पथक सहभागी झाले होते. विविध वेशभुषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.

शाळेच्या मैदानात स्वामी विवेकानंद वाचनालय आंदोरा यांच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन ,येडाई व्यसन मुक्ती केंद्र येरमाळाच्या वतीने व्यसनाचे दुष्परिणाम यावर प्रदर्शन तर कृष्णा हॉस्पिटल कळंबच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन तर महिला बचत गटाच्यावतीने बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी सहाय्यक आयुक्त संतोष राऊत म्हणाले की ग्रामीण भागातील जिल्हापरिषदेच्या शाळेतील गुणवत्ता इतर खाजगी शाळेपेक्षा निश्चितच चांगली आहे. मी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पाहिल्या आहेत त्यातून मला पहावयास मिळाले आहे.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे म्हणाले की, शताब्दी महोत्सव साजरी करणारी ही शाळा मी प्रथमच पाहत आहे. आंदोरा शाळेसाठी डायट मार्फत विविध योजना राबवण्यात येणार आहेत. सरपंच बळवत तांबारे म्हणाले की शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत च्यावतीने पाच लाख पन्नास हजाराची तरतुद करण्यात आली असुन भविष्यात शाळेला कसलीही कमतरता पडु दिली जाणार नाही. वेळप्रसंगी शाळेसाठी जवळची रक्कम खर्च करण्याची तयारी दर्शवली. माजी विद्यार्थी म्हणून देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी पुर्वीचे शिक्षक तन व मनाने शाळेत काम करायचे पण काळाचा महिमा बदलला आज काही शिक्षक शरीराने शाळेत असतात पण मनाने इतरत्र असतात. म्हणून शिक्षक व विद्यार्थी यांचे अंतर वाढत चालले आहे. ते कमी होणे गरजेचे आहे.

तर डॉ. संदिप तांबारे यांनी आपल्या रांगड्या भाषेत शिक्षणाचे महत्व व शाळेतील अनुभव कथन केले. यावेळी शिक्षकातून अमोल बाभळे तर महिला प्रतिनिधी म्हणून सुरेखा तांबारे यांनी विचार मांडले.तर शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागत गीत, टिपरीनृत्य सादर केले. प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेचा पुर्वइतिहा व शताब्दी सोहळ्याचा हेतू विशद केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीकांत तांबारे , विद्या वैद्य व डाँ.रेवती घाडगे यांनी तर आभार मदन तांबारे यांनी मानले.

धाराशिव जिल्हापरिषदेची शतक महोत्सव साजरा करणारी जिल्ह्यातील जिल्हापरिषद विद्यामंदिर आंदोरा ही पहिली शाळा आहे. या शताब्दी महोत्सवामुळे 30-40 वर्षानंतर गाठीभेटी झाल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 93 वर्ष वय असलेले येडबा कवडे हे विद्यार्थी व 90 वर्ष वय झालेल्या शिक्षिका श्रीमती प्रतिभा बावीकर या शताब्दी महोत्सवात उपस्थित होते.

दरम्यान आंदोरा गावचे सरपंच तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बळवंत तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कौश्यल्य विकास मंत्रालय मुंबई चे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाँ. दयानंद जटनुरे, तहसिलदार राजाभाऊ कदम माजी सरपंच अशोक तांबारे, चेअरमन माणिक कवडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी,उपसरपंच दत्तात्रय तांबारे केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष अदिनाथ कवडे कमलाकर तांबारे उपस्थित होते.