सत्तासंघर्षात बळीराजाकडे दुर्लक्ष, दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड

>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. पण, सत्ता वाढवण्याच्या धुंदीत सत्ताधाऱ्यांना बळीराजाचा विसर पडल्याचं चित्र दिसत आहे. कारण, संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने करपणाऱ्या पिकांना वाचवणाऱ्या बळीराजाची धडपड मात्र कुणालाही दिसलेली नाही. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून राजकारणाचा खेळ सुरू आहे.

जून महिन्यात आलेल्या तूरळक पावसात बळीराजाने पेरणी उरकली. धान पऱ्हे टाकले. मात्र त्यानंतर पाऊस रुसला. उष्णता वाढली. शेतातील अंकुर करपू लागले. दुबार पेरणीचं संकट बळीराजावर घोंघावू लागलं आहे. भर पावसाळ्यात पिकांना मोटारपंपाने पाणी द्यावं लागत आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, ते शेतकरी पिके वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत. तर कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पिके करपली तर दुबार पेरणीसाठी पैसा कुठून उभा करायचा असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.