महाविकास आघाडी भाजपविरोधात एकजुटीने लढा देईल!

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमधूनच आगामी निवडणुका लढवेल आणि भाजपविरोधात एकजुटीने लढा देईल, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज स्पष्ट केले. सद्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या आमदारांची बैठक आज विधान भवनात बोलवली होती. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान भवनातील कार्यालयात ही बैठक बोलवली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष एकसंध असून या बैठकीला 39 आमदार उपस्थित होते आणि जे उपस्थित नव्हते त्यांनी आम्हाला त्याची सूचना आधीच दिली होती.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, आशीष दुआ आदी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. विधान भवनातील बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

सर्वांशी चर्चा करूनच विरोधी पक्षनेता ठरवणार
‘विरोधी पक्षनेतेपदाबाबत या बैठकीत निर्णय झाला का?’ असे पत्रकारांनी यावेळी पाटील यांना विचारले असता ‘त्यासंदर्भात योग्य वेळी आणि आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,’ असे एच. के. पाटील यांनी सांगितले.

सरकारविरोधात आवाज उठवत राहणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून भाजपविरोधात लढण्यावर चर्चा झाली असून काँग्रेस पक्ष पावसाळी अधिवेशनातही सरकारविरोधात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवेल, असे थोरात म्हणाले.

भाजपचा खरा चेहरा उघडा पाडू
जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारू आणि भाजपचा खरा चेहरा उघडा पाडू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. मोदी-शहा यांनी दिल्लीतून लिहून पाठवलेल्या स्क्रिप्टनुसारच महाराष्ट्रात राजकीय नाटय़ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरविली जाईल, असे पटोले म्हणाले.