पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून वाद; पुणे काँग्रेसचा विरोध

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर काही वेळातच राजकारण सुरू झालं आहे. पुणे काँग्रेसनं या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षानं तसं पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलं आहे.

पण तर पुरस्कार देणारी संस्था ही स्वतंत्र असूनही त्यांनी कुणाला पुरस्कार द्यावा, त्यांचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिली आहे.

पुण्यातील टिळक स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे पदावर कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना प्रथमच या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे काँग्रेसने मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी मागणी लावून धरली आहे. पुणे काँग्रेसकडून पत्राद्वारे तशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली असून आता प्रदेश काँग्रेस यावर कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्षं लागलं आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मात्र पुणे काँग्रेस पेक्षा वेगळं मत मांडलं आहे. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देणारी संस्था ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे त्या संस्थेनं कोणाला पुरस्कार द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे’.