Dombivli Blast : गद्दारांच्या सरकारने निष्पापांचे बळी घेतले, चौकशी झालीच पाहिजे! अंबादास दानवे आक्रमक

डोंबिवली एमआयडीसीत फेज-2 मधील अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात आतापर्यंत 11 जण ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झालेत. स्फोटाच्या या भंयकर घटनेनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची एम्स रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या घटनेला आणि त्यात निष्पापांचे बळी जाण्याला गद्दारांचे सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच या प्रकरणी कंपनीवर कारवाई करावी आणि संबंधित सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

औद्योगिक सुरक्षेसंदर्भात काम करणारा सरकारचा विभाग हा इथे कुठेच दिसत नाही, इथली परिस्थिती पाहून हे लगेचच लक्षात येतं. कारण दाट वस्ती असलेल्या रहिवासी भागात विषारी केमिकल असलेल्या कंपन्या चालणं हाच मोठा क्राईम आहे. इथे भलेही दहा कामगार असतील. प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिअॅक्टर जिथे आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे, असा नियम आहे. पण इथे तसा कोणताही माणूस दिसून येत नाही. रिअॅक्टर हँडल करणं हे साध्या कामगाराचं काम नाही आणि तो करूच शकत नाही. त्याच्याकडून ही आपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचे प्रमाण जे आवाश्यक असतं ते व्यस्त किंवा अव्यस्त होतं तेव्हा रिअॅक्टरचा स्फोट होतो. याला जबाबदार पूर्णपणे इथली फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे. आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचंही याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

Dombivli blast update – मृतांचा आकडा 11 वर, कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

माझ्या माहिती प्रमाणे अडीच वर्षांपूर्वी उद्धवजी ठाकरेसाहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती. या भागात जवळपास अशा साडेचारशे कंपन्या आहेत. त्यातल्या पाच कंपन्या या विषारी केमिकलच्या आहेत. त्या या औद्योगिक परिसरातून हलवण्याचा आदेश दिला गेलेला आहे. काल मुख्यमंत्री इथे येऊन गेले आणि म्हणाले, आम्ही या कंपन्या अंबरनाथला शिफ्ट करू. पण हा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. ते मुख्यमंत्री झाल्यावर या प्रकरणी एकही पाऊल उचललं गेलेलं नाही. हे स्फोटाची वाट पाहात होते का? 11 जणांचा बळी जाण्याची वाट पाहात होते का? ही घटना या परिसरातील पहिली नाही. माझ्या माहिती प्रमाणे 2016-17 पासून पाचवी-सहावी ही दुर्घटना आहे. अनेक लोकांचे बळी गेलेत. आणि याला सर्वस्वी इथल्या कंपन्यांचे मालक जसे जबाबदार आहेत तसे इथला उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि राज्य सरकारही जबाबदार आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

मागच्या वर्षभरात नाशिकमध्ये जिंदाल कंपनीत स्फोट झाला होता. बोईसर एमआयडीसीत स्फोट झाला होता. त्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथे स्फोट झालेला, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्फोट झालेला, नागपूरलाही झालेला होता. हे सगळे स्फोट हे बहुतेक करून रिअॅक्टरचे स्फोट आहेत. बॉयलर विषयी धोरण आहे. रिअॅक्टरविषयी धोरण असावं, अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. अशा छोट्या फॅक्टरी काय करतात? तर मोठ्या फॅक्टरींनी विकलेले, डिसमेंटल केलेले रिअॅक्टर्स वापरत असतात. हे चुकीचं आहे. म्हणून बॉयलर विषयी धोरण आहे, तसं रिअॅक्टर विषयी धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिअॅक्टर का फुटतात कारण हे जुने असतात. आणि रिअॅक्टर हे महागडे असल्याने छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणंही अवघड असतं, असे ते पुढे म्हणाले.

Photo – डोंबिवली एमआयडीसीतील भीषण स्फोटाचे हादरवणारे फोटो समोर

2016 ला प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर उद्धवजी ठाकरे यांनी या भागतल्या सर्व उद्योजकांची बैठक घेतली होती. संपूर्ण औद्योगिक पट्टा शिफ्ट करणं अवघड आहे. परंतु ज्या पाच कंपन्या आहे इथल्या या सगळ्या इथून शिफ्ट केल्या पाहिजेत आणि इथून बंद केल्या पाहिजेत, हे ठरवलेलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं. आता जे गद्दारांचं सरकार आलं, या सरकारने या प्रकरणी कुठलंही पाऊल उचललेलं नाही. अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतंय, अशी शंका आमच्या मनात आहे, असे त्यांनी सांगितले.

गुन्हा दाखल झाला असेल किंवा होईल. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. कंपनीच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी लागेल. अटक करावी लागेल. औद्योगिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल. कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल. या सर्व चौकशा या प्रकरणाच्या कार्यक्षेत्रात येतात. पर्यावरण विभागाचीही यात मोठी भूमिका आहे. या सगळ्या विभागांची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू. अधिवेशनात आम्ही हा मुद्दा नक्कीच मांडू. कारण इतक्या जणांचा इथे बळी गेला आहे, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.