पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या, सुरक्षा यंत्रणा सतर्क; तपास सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ड्रोन उडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा भाग ‘नो फ्लाईंग झोन’ असतानाही ड्रोन उडवल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एसपीजी अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली असून तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ड्रोनसदृष्य वस्तू उडत असल्याचे दिसले. एसपीजी अधिकाऱ्यांनी ड्रोन पाहिल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. यानंतर दिल्ली पोलिसांची ड्रोनचा आणि ते उडवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पळापळ सुरू झाली. मात्र अद्याप ड्रोनचा सुगावा लागलेला नाही.

याबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एक अज्ञात वस्तू उडत असल्याची माहिती एनडीडी नियंत्रण कक्षाला मिळाली. यानंतर आजूबाजूच्या भागात कसून शोध घेण्यात आला, मात्र अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही. एअर ट्राफिक कंट्रोल रूमशीही संपर्क साधून ड्रोनची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू आढळली नाही.

दरम्यान, देशाच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान बंगला क्रमांक 7 आहे. नवी दिल्लीच्या लुटियन्स झोनच्या लोक कल्याण मार्गावर हा बंगला आहे आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे वास्तव्य आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव ‘पंचवटी’ आहे. 5 बंगले एकत्र करून ते तयार करण्यात आले आहे. यात पंतप्रधान कार्यालय-सह-निवास क्षेत्र आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे- ज्यापैकी एक विशेष संरक्षण गट (SPG) आणि दुसरे अतिथीगृह आहे.