India Vs South Africa Test Match – शेवटची सरहद्द

 

  • द्वारकानाथ संझगिरी

दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत हरवणं ही हिंदुस्थानी संघासाठी ओलांडायला उरलेली क्रिकेटमधली शेवटची सरहद्द आहे.

आजपर्यंत हिंदुस्थानी संघाने इतर देशांत जाऊन त्या त्या देशांना हरवलंय. मालिका जिंकल्या. फक्त दक्षिण आफ्रिकेतच हिंदुस्थानी संघाने कधी मालिका जिंकली नव्हती. आता मात्र संधी आलीय. अफगाणिस्तानही उरलंय, पण हिंदुस्थानी संघ सुरुंग आणि बॉम्बच्या खेळपट्टीवर खेळायला जाईल असं मला वाटत नाही.

या दक्षिण आफ्रिकेच्या सरहद्दीची पहिली भिंत हिंदुस्थानी संघाने सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत तोडली. 113 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या या भिंती आता पूर्वीप्रमाणे दगडी राहिलेल्या नाहीत. खिंड लढवायला त्यांच्याकडे आता एबी डिव्हिलियर्ससुद्धा नाही.

तिथल्या काळ्या जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी राखीव जागांची पॉलिसी आणली. ती क्रिकेटमध्येसुद्धा ते राबवताहेत. याचा पुढे त्यांना फायदा होईल. काळ्या बहुसंख्यांमध्ये क्रिकेट रुजेल, पण आज त्याचा त्यांना तोटा होतोय आणि तो होणारच. कारण आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट हे उर्मट गोऱ्यांचं क्रिकेट होतं. नेल्सन मंडेला प्रेसिडेंट होईपर्यंत त्यांनी त्यावर काळ्यांची काळी सावलीसुद्धा पडू दिली नव्हती.

आणि म्हणूनच आज दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पूर्वीपेक्षा खूप कमकुवत आहे. त्यांच्या संघात मोठी नावं नाहीत. कॅगिसो रबाडा आणि कर्णधार एल्गर सोडला तर त्यांची फारशी नावं आपल्याला ज्ञातसुद्धा नाहीत. विचार करा की, त्यांचा कर्णधार एल्गर फक्त 70 कसोटी सामने खेळलेला आहे आणि तो सर्वाधिक कसोटी सामने खेळलेला त्यांचा खेळाडू आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की, आपल्या अनुभवाच्या गगनचुंबी टॉवरपुढे त्यांचा अनुभवही फक्त तीन मजल्यांची इमारत आहे. विराट, पुजारा, रहाणे, अश्विन, शमी यांचे कसोटी सामने मोजा म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय ते लक्षात येईल.

हिंदुस्थानच्या या विजयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल, पण तरीही ‘यह लडाई है दिए की और तुफान की…’ असंच वाटतं आणि हे तुफान जे आहे ना ते हिंदुस्थानी गोलंदाजांचं आहे आणि थरथरणारा दिवा म्हणजे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी.

काही गोष्टी या कसोटीत आपल्या मनासारख्या घडल्या. हिंदुस्थानने  टॉस जिंकला. पहिली फलंदाजी मिळाली. उपकर्णधार राहुल आणि मयांक अग्रवालने भक्कम सुरुवात करून दिली. ‘मॅन ऑफ द मॅच’ राहुलने चांगलीच फलंदाजी केली. राहुल हा अत्यंत गुणवान फलंदाज आहे. त्याच्याकडे फटके आहेत. त्याच्याकडे उत्तम तंत्र आहे आणि आता तो हळूहळू मॅच्युअर व्हायला लागलाय. त्याच्या फलंदाजीत सातत्य आलंय आणि त्यामुळे गावसकर म्हणतो, ‘‘यापुढे राहुल शतकांचा पाऊस पाडू शकतो.’’

 मी एवढंच म्हणेन ‘तथास्तु’ आणि राहुलने आता शतकं करायची गरजही आहे. कारण आपले पूर्वीचे शतकवीर आता हळूहळू सूर्यास्ताकडे झुकलेत. उदाहरणार्थ पुजारा. पहिल्या डावात शून्यावर बाद होऊन परतताना जमीन दुभंगून पोटात घेईल तर बरं होईल, असं पुजाराला वाटलं असेल. हजार निवृत्तीचे आणि अपयशाचे विचार याने त्याचं मन वेढलं असेल.

विराट पहिल्या डावात आत्मविश्वासाने खेळत होता. पुन्हा मनात शतकाची अपेक्षा उसळी घेऊन वर आली, पण बाहेरच्या चेंडूकडे त्याची बॅट ओढली गेली. ‘तुमने पुकारा और हम चले आये, विकेट हथेली पर ले आये…’ वगैरे म्हणत.

 रहाणे डोक्यावर सातत्याने असलेली टांगती तलवार आणि अपयशाचं ओझं घेऊन बॅटिंगला आला, पण या वेळेला त्याने खूप आत्मविश्वासाने फलंदाजी केली. काही चांगले चौकार मारले, पण पुन्हा नव्याने तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आल्यानंतर तो आपण हिंदुस्थानात खेळत नाहीये, हे विसरला आणि त्याने उसळत्या चेंडूवर बॅकफूटला जाऊन कट मारण्याचा प्रयत्न केला. त्याने तो फटका हिंदुस्थानी खेळपट्टीवर मारला असता ना तर तो चालून गेला असता, पण तिथे आफ्रिकेत या खेळपट्टीवर चेंडू उसळत होता आणि वर टेक ऑफ घेत होता. तिथे अशा प्रकारचा फटका हा धोकादायक ठरू शकतो आणि तो रहाणेसाठी धोकादायक ठरला. धावांचं वाढणारं झाड अचानक खुंटलं.

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एंगीडीने अप्रतिम गोलंदाजी टाकली आणि त्याला रबाडाने चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कमकुवत आहेच, पण आपली वेगवान गोलंदाजी ही आपल्या इतिहासातली सर्वात समृद्ध अशी गोलंदाजी आहे. चार-चार दर्जेदार गोलंदाज आज आपण आरामात खेळवू शकतो. शमीने अत्यंत सुंदर स्पेल टाकले. त्याचा टप्पा, दिशा, स्विंग सगळंच वरच्या दर्जाचं होतं.

 बुमराह तर आज जगातला अव्वल वेगवान गोलंदाज आहे. टी-20 च्या पाळण्यात जन्माला येऊनसुद्धा त्याने स्वतःला टेस्ट क्रिकेटमध्ये किती सहजपणे ऍडजस्ट करून घेतलं.

दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाने उत्कृष्ट खेळी केली. त्या उत्कृष्ट खेळीत काही अप्रतिम ड्राईव्ह मारले. ते ड्राईव्ह इतके सुंदर होते की, त्यातला एखादा स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याकडेसुद्धा ठेवून घ्यावा, असं सचिनलासुद्धा वाटलं असेल.

पहिल्या डावतली हिंदुस्थानला मिळालेली 130 डावांची आघाडी फार महत्त्वाची होती. ती खऱ्या अर्थाने विजयाची प्रस्तावना होती, पण दुसऱ्या डावात हिंदुस्थानने फलंदाजीच्या पुस्तकातलं एकही सोनेरी पान लिहिलं नाही. सोनेरी जाऊ दे तांब्याचं पानसुद्धा नव्हतं. हिंदुस्थानी फलंदाजीची पाने ऍल्युमिनियम इतकी सामान्य वाटली. पुजाराने फक्त स्वतःच्या अपयशात भर घातली.

कोहली बाद झाला नेहमीप्रमाणे. बाहेरच्या चेंडूसाठी पुन्हा तेच गाणं गुणगुणत, ‘तुमने पुकारा और हम चले आये…’ फक्त क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज बदलले. कोहली त्या फटाक्यांवर कव्हर ड्राईव्ह करताना वारंवार बाद होतोय. त्याने याबाबतीत सचिनकडून धडा घ्यायला पाहिजे. 2003 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर सचिन ज्या वेळेला अशा पद्धतीने बाद होत होता, त्या वेळेला त्याने तो फटकाच काढून टाकला आणि मग त्याने त्या कसोटीत नाबाद 241 आणि नाबाद 60 धावा ठोकल्या होत्या. तो निग्रह कोहलीला दाखवावा लागेल. तो फटका काय कायम काढून टाकण्याची गरज नाही, पण सध्या त्यावर बाद होत असताना आणि आपला पाय तिथपर्यंत न जात असताना मला वाटतं की, जे सचिनने केलं ते कोहलीने करावं. कोहलीला एका शतकाची गरज आहे. त्यानंतर कदाचित फलंदाजीत त्याची धावांची झालेली कोंडी फुटू शकेल.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चौथ्या डावात 300 धावा काढून जिंकणं झेपणारं नव्हतं. तरीही कर्णधार एल्गर लढला आणि आशावादी वाटणाऱ्या बावुमाचा दिवा अधिक प्रज्वलित झालेला वाटला. हिंदुस्थानी गोलंदाजांनी पुन्हा अप्रतिम गोलंदाजी केली. ती खेळपट्टी त्यासाठी मदत करायला सदैव तयार होती. पहिल्या डावात विकेटच्या बाबतीत शमीची मोनोपॉली होती, पण दुसऱ्या डावात ठाकूर सोडला तर सगळ्यांनी विकेट्स वाटून घेतल्या आणि शेवटी अश्विनने दोन विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव उगाचच लांबणार नाही, हे पाहिलं.

 एकच गोष्ट मला पटली नाही, ती म्हणजे सिराजने बावुमाच्या अंगावर केलेला थ्रो, जो त्याच्या घोटय़ाला लागला. काहीही गरज नसताना त्याने तो थ्रो केला. बावुमा कुठे तरी धाव काढायला निघाला होता, क्रिझच्या बाहेर होता, असं कुठेही जाणवलं नाही. ते केवळ फ्रस्ट्रेशन होतं असं वाटलं. सिराज हा गोलंदाज म्हणून मला आवडतो. त्याचा आवेशही मला आवडतो. त्याची ती आक्रमकता आवडते, पण आक्रमकतेलाही कुठे तरी लगाम घालावा लागतो. आक्रमकता ही खिलाडूवृत्तीच्या आड येता कामा नये. त्यामुळे सिराजचं खरं तर चुकलंच. कदाचित मॅच रेफ्रीकडून त्याला त्याची शिक्षा मिळेल.

पहिल्या कसोटीप्रमाणेच हिंदुस्थानी टीमचं पुढचं पाऊलही पुन्हा असंच पडलं तर आपण आपल्या डोळ्यासमोर ही शेवटची सरहद्द पार करू. ही भिंत तोडणं कठीण गोष्ट आहे, असं आजतरी वाटत नाही. कारण दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आता ठिसूळ आहे. आता तोडणार नाही तर कधी तोडणार?

[email protected]