164 कोटींच्या खंडणीशी ईडी अधिकाऱ्यांचा संबंध? सहा आरोपींना अटक

ओंकार डेव्हलपरकडून 164 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या हिरेन रमेश भगत ऊर्फ रोमी भगत याला मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरातून अन्यत्र हलवण्यात आलेल्या सहा सुटकेसमध्ये कोटयवधी रुपयांसह एफआयआर, तक्रारीच्या कागदपत्रांचा खच सापडल्याची खळबळजनक माहिती गुन्हे शाखेने न्यायालयात दिली. त्यामुळे खंडणी रॅकेटशी ईडीच्या अधिकाऱयांचा संबंध असल्याचा संशय बळावला आहे.

ईडी अधिकाऱयांच्या नावाने धमकी देत पैसे उकळणाऱया रॅकेटमधील सहा आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने अटक केली आहे. त्यात अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाट, राकेश केडिया, कल्पेश भोसले आणि सेवानिवृत्त कस्टम अधिकाऱयाचा मुलगा अमेय सावेकर याच्यासह रोमी भगतचा समावेश आहे. भगतला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत मंगळवारी संपल्याने भगतला पुन्हा न्यायालयापुढे हजर केले होते.

तपास अधिकाऱयांनी भगतच्या घरात आणि कर्नाटक बँकेच्या शाखेतील लॉकरमध्ये कोटय़वधी रुपयांचे घबाड, मोठमोठय़ा कंपन्यांविरुद्ध केलेले तक्रार अर्ज, एफआयआरच्या प्रती व इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती न्यायालयाला दिली. याच अनुषंगाने अधिक तपासासाठी आरोपी भगतला आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याची विनंती गुन्हे शाखेतर्फे करण्यात आली. त्यावर आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हे शाखेची विनंती मान्य केली आणि भगतची आणखी सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.

भगतच्या घरात मोठय़ा प्रमाणावर कागदपत्रे सापडली असून केंद्रीय तपास यंत्रणांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे या रॅकेटपर्यंत कशी पोहोचली? रॅकेटमध्ये ईडी अधिकाऱयांचा संबंध आहे का? याचा उलगडा पुढील तपासात होण्याची शक्यता आहे.

आरोपीच्या घरात एफआयआर, तक्रारीच्या कागदपत्रांचा खच
रोमी भगतला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच घराच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता भगतचा नोकर स्कूटरवरून सहा मोठय़ा सुटकेसमधून काहीतरी घेऊन गेल्याचे आढळले. नंतर त्या सुटकेसचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर देशीविदेशी चलन, दागिने, तीन विदेशी बनावटीची अग्निशस्त्र, 150 जिवंत काडतुसे आणि कागदपत्रांचा खच सापडल्याचे तपास अधिकाऱयांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले.