आरजे ते अभिनेता

>> गणेश आचवल

प्लॅनेट मराठीवरील ‘गुड वाइब्स ओन्ली’ या चित्रपटातून श्रवण बने अभिनेता म्हणून आपल्यासमोर येत आहे. यानिमित्त ‘आरजे ते अभिनेता’ असा प्रवास केलेल्या श्रवणशी साधलेला संवाद.

 – श्रवण, अभिनेता होण्यापूर्वी तू एक उत्तम आरजे आहेस. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.  

 मी अंधेरी येथील भवन्स कॉलेजमधून बीएमएम ग्रॅज्युएट झालो. कॉलेजमध्ये असताना मी एकांकिकेत अभिनय करत होतो. मग मी वांद्रे येथील एमइटी कॉलेजमधून मास्टर्स केले.  मी कॉपी रायटर म्हणून काम करत होतो. कॉलेजमध्ये असताना जे काही प्रोजेक्टस् केले होते, त्यातले काही प्रोजेक्टस् घेऊन मी रेडिओ इंडस्ट्रीत गेलो होतो. त्यातून मला ‘बिग 92. 7’ एफ एमवर आरजे होण्याची संधी मिळाली. तिथे काही वर्षे मी मार्ंनग शो सादर करत होतो. मग काही वर्षांनी मी ‘फिव्हर एफ एम’वर ‘लय भारी विथ रेडिओचा मराठी मुलगा’ अशी लाइन घेऊन कार्यक्रम सादर करू लागलो.

–  प्लॅनेट मराठीसाठीसुद्धा तू काम करत आहेस.

अक्षय बर्दापूरकर यांची मी मुलाखत घेतली होती. मग प्लॅनेट मराठीवरसुद्धा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. एनसीपीएमध्ये ‘प्रतिबिंब’ हा नाटय़ महोत्सव सादर झाला होता. त्याकरिता प्लॅनेट मराठीसाठी कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. अनेक कलावंतांशी थिएटरबद्दल त्यानिमित्ताने मी संवाद साधला होता.

– ‘गुड वाइब्स ओन्ली’मधील भूमिकेविषयी सांग.

 ‘गुड वाइब्स ओन्ली’ चित्रपटाचे दिग्दर्शक जुगल यांनी मला ही संधी दिली. रेडिओ क्षेत्रात काम करता करता अनेक ऑडिओ ड्रामा सादर केले होते. त्यामुळे स्वराभिनयाचे ज्ञान होते. आता पडद्यावर मी पहिल्यांदाच अभिनेता म्हणून समोर येणार होतो. गंमत म्हणजे या चित्रपटातील माझ्या व्यक्तिरेखेचे नावदेखील ‘श्रवण’ आहे. यात मी एक सोलो ट्रव्हलरची भूमिका करत आहे. एका ट्रीपच्या निमित्ताने श्रवण आणि तारा (आरती केळकर) यांची भेट होते. तिच्या आयुष्यात काही समस्या आहेत. श्रवणच्या आयुष्यातदेखील काही समस्या आहेत. या ट्रीपच्या निमित्ताने दोघांच्या मैत्रीची कथा तुम्हाला यात बघता येईल.

  तुझे आगामी प्रोजेक्टस् कोणते?

– माझे वडील अजय बने हे सिनेजगतातील पीआरओ होते. त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी या क्षेत्रातील कलाकारांना जवळून पाहिले आहे. इंडस्ट्रीत येताना जो आत्मविश्वास होता, त्याचे श्रेय अर्थातच वडिलांच्या संस्कारांचे आहेत. आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर सध्या ऑडिओ क्षेत्राला खूप चांगले दिवस आले आहेत. अनेक व्हॉइस ओव्हर्ससुद्धा मी करत आहे. काही पॉडकास्ट लवकरच मी सुरू करणार आहे.