काँग्रेस नेते कमल नाथ यांचा फोन हॅक केला, राजकारण्यांकडे मागितली खंडणी

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमल नाथ यांचा फोन 2 जणांनी हॅक केला. हा फोन हॅक केल्यानंतर या दोघांनी त्यावरून राजकारण्यांना फोन करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. यातल्या एका नेत्याला संशय आल्याने त्याने कमल नाथ यांच्याशी अन्य मार्गांनी संपर्क साधला आणि ही बाब त्यांच्या कानावर घातली. यानंतर कमल नाथ यांना आपला फोन हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना कमल नाथ यांचा फोन हॅक केला आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांकडे पैसे मागण्यास सुरूवात केली. आरोपींनी काँग्रेसचे खजिनदार अशोक सिंह यांना कमल नाथ यांच्या मोबाईल नंबरवरून फोन फिरवला होता आणि त्यांच्याकडे 10 लाख रुपये मागितले होते. याव्यतिरिक्त आरोपींनी इंदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरजित सिंह चढ्ढा, काँग्रेस आमदार सतीश सिकरवार , काँग्रेस खजिनदार गोविंद गोयल यांच्याकडेही खंडणी मागितली होती. यातल्या गोविंद गोयल यांना संशय आल्याने त्यांनी कमल नाथ यांच्याशी संपर्क साधला होता. कमल नाथ यांचा फोन हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोयल यांनी आरोपींना पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी बोलावले होते. आरोपी त्यांच्या घरी पोहोचताच पोलिसांनी दोघांना ताब्यात केली. दोन्ही आरोपी हे गुजरातचे असून सागार सिंह परमार आणि पिंटू परमार अशी या दोघांची नावे आहेत.