तुमच्या मुलाने क्रिकेटमध्ये किती धावा काढल्या? उदयनिधी स्टॅलिन यांचा अमित शहांना सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी तामिळनाडू येथील रामेश्वरममध्ये ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर बोलताना अमित शाह यांनी तामिळनाडू स्टॅलिन सरकारवर टीका केली. तामिळनाडूतील घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करण्यासाठी ही यात्रा आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. अमित शहा यांच्या या टीकेला तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्या पदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, निवडणूक लढवत मी आमदार झालो. नंतर मला मंत्रीपदाची संधी देण्यात आली. पण, मला अमित शाह यांना विचारायचे आहे की तुमचा मुलगा बीसीसीआयचा सचिव कसा झाला? त्याने किती क्रिकेटचे सामने खेळले? आणि किती धावा काढल्या? उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट सवाल करत त्यांच्या घराणेशाहीच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये भाजप विरुद्ध द्रमुक असा संधर्ष होण्याची चिन्हे आहेत.