मी शरद पवार यांच्यासोबतच! अमित शहांना कधी भेटलो याबद्दल तुम्हीच संशोधन करा! जयंत पाटील यांचा टोला

मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, पण लोकांमध्ये माझ्याबद्दल संभ्रम पसरवला जात आहे. महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की, मी काय आहे? मी काल शरद पवारांसोबत होतो आणि पुढेही राहणार. माझ्याकडून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी अमित शहांना भेटलो याबद्दल तुम्ही संशोधन करा, घरी बसून बातम्या पेरल्या जात असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मी काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. त्यानंतर मी आणि काही सहकारी माझ्या निवासस्थानी रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा करत बसलो होतो. यानंतर मी सकाळी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. यात मी मुंबईहून कधी पुण्यात गेलो, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटील आणि शहा यांची भेट झाली नसल्याचे म्हटले आहे.