राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डी दौऱयावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या शिर्डी दौऱयावर येणार आहेत. त्यांच्या स्वागताची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शिर्डीत साईसमाधी दर्शनासाठी येणाऱया त्या सहाव्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांची रंगरंगोटी, स्वच्छता, शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आदी ठिकाणांची कामे जलदगतीने सुरू आहेत. शिर्डीत यापूर्वी नीलम संजीव रेड्डी, शंकरदयाळ शर्मा, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी व रामनाथ कोविंद यांनी साईदर्शनासाठी शिर्डीला भेट दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी दुपारी शिर्डीत दाखल होणार आहेत. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावून त्या साईसमाधीवर पाद्यपूजा करणार आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, साई संस्थान व शिर्डी नगरपरिषदेकडून जय्यत तयारी सुरू आहे.