Lok Sabha Election 2024 – मराठा समाजानं खिंडीत गाठलं, आंदोलक आक्रमक होताच अशोक चव्हाणांचा काढता पाय

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे पोहोचलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रकार ताजा असतानाच अशोक चव्हाण यांनाही घेरत मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. आंदोलक आक्रमक होताच अशोक चव्हाण यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

मराठा आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसगट आरक्षण द्यावे या मागणीवर समाज ठाम आहे. दोन दिवसांपूर्वी नायगाव येथील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांना पक्ष बदलाच्या धोरणाबाबत व रटाळ भाषणाबद्दल कार्यकर्त्यांनी जाब विचार, त्यांचे भाषण थांबवले होते. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. भाजप उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मध्यस्थी करावी लागली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

हा प्रकार ताजा असताना सोमवारी सकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे गेले होते. मात्र गावात येण्यापूर्वीच त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांची गाडी गावात येताच काही युवकांनी व नागरिकांनी अडवून राजकीय प्रचारासाठी या गावात यायचे नाही, असा दम दिला. यावेळी तरुणांनी ‘एक मराठा एक लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकर्‍यांचा रोष एवढा जबरदस्त होता की, कोंढा येथील बैठक घेण्याऐवजी चव्हाण यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

तुमचे रटाळ भाषण बंद करा…; भाजप बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक